पुणे – राज्यात जमीन मोजणीसाठी रोव्हर व ड्रोन या अत्याधुनिक तंत्राचा वापर केला जात आहे. रोव्हरद्वारे अर्धा तासात अचूक मोजणी होते आणि जमिनीचे अक्षांश रेखांश आधारित नकाशा मिळाल्यामुळे त्याची वैधता अबाधित राहणार आहे. भूमि अभिलेख विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नानंतर सहा महिने व एक वर्षांपेक्षा जास्त कालावधीचे मोजणी अर्ज निकाली काढण्याची मोहीम यशस्वी होत आहे. त्याआधारेच आता जमीन मोजणीसाठी अर्ज केल्यापासून तीन महिन्याच्या आत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. भारतातील जमिनींची मोजणी 10 एप्रिल 1802 रोजी सुरू झाली. त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय भूमापन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने भूमि अभिलेख विभागाचा घेतलेला आढावा.
“ई-मोजणी’त बदल
ई-मोजणी संगणक प्रणालीमध्ये मोजणी अर्ज भरले जातात. याप्रणालीमध्ये अमुलाग्र बदल करून ई-मोजणी व्हर्जन 2 मध्ये लवकरच जमीनधारक स्वत:च मोजणी अर्ज भरू शकणार आहे. ऑनलाइन मोजणी शुल्क भरण्याची देखील सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच आपल्या मोजणी अर्जाबाबतची प्रगती एसएमएस द्वारे अर्जदाराला कळविण्यात येणार आहे. मोजणी नकाशांची रियल कोर्डीनेट्स देखील या प्रणाली द्वारे उपलब्ध केले जाणार आहेत.
“महाभूमि’मुळे वेळेची बचत
महाभूमि संकेतस्थळावर सातबारा उतारे, नमुना आठ अ, मालमत्ता पत्रक उपलब्ध करुन दिले आहेत. 2021 पासून फेरफार नोंदी ऑनलाइन पध्दतीने घेतल्या जात आहेत. नोंदणीकृत दस्ताच्या नोंदीही ऑनलाइन पध्दतीन सुरू आहेत. यामध्ये ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांना कार्यालयात कोणत्याही फेरफार नोंदीच्या अर्जासाठी हेलपाटे घालण्याची गरज राहणार नाही. त्यामुळे वेळेचीही बचत होणार आहे.
असा आला ‘गुंठा’ शब्द…
सर लॅम्बटन यांनी दक्षिण भारतातील केपकामोरिन येथून 10 एप्रिल 1802 मध्ये त्रिकोणमितीय भूमापनाची सुरुवात केली होती. भूमापनाच्या कामात सर जॉर्ज एव्हरेस्ट यांनी मोठी मदत केली. सर जॉर्ज एव्हरेस्ट भूमापक प्रमुख व त्रिकोणमीतीय भूमापनाचे अधीक्षक होते. ब्रिटीशांच्या कारकिर्दीत शेत जमिनीची शास्त्रशुध्द पध्दतीने गुंटर नावाच्या अधिकाऱ्यांने अंमलात आणलेल्या शंकू साखळीने मोजणी करण्यात आली. म्हणून शंकू साखळीस गुंटर चैन, गुंठा असे म्हणत. सदर साखळी 33 फुट लांबीची असून 16 भागात विभागली आहे. त्या प्रत्येक भागाला आणा म्हणत व गुंटर साहेबांच्या नावावरुन पुढे गुंठा प्रचलित झाला. जमिन महसूल ठरविण्याचा पहिला मान पुणे जिल्हातील इंदापूर तालुक्यातील भिगवण येथून प्रिंगले नावाच्या सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी सन 1827 मध्ये मिळविला.
स्वामित्व योजनेअंतर्गत भूमी अभिलेख विभाग, ग्रामविकास विभाग, सर्वे ऑफ इंडिया यांच्या विद्यमाने महाराष्ट्रातील सर्व गावांचे गावठाणातील मिळकतीचे अत्याधुनिक पध्दतीने ड्रोनव्दारे मोजणी होत आहे. गावठाणातील मिळकतींचे मालकी हक्काचे मालमत्ता पत्रक (प्रॉपर्टी कार्ड) तयार करण्यात येत आहे. आता आधुनिक तंत्राद्वारे अचूकपणा, प्रत्येक नागरीकाना मालकी हक्काचे डिजिटल मिळकत पत्रिका मिळत आहे. 2024 पर्यत गावठाणांची मोजणीचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
-निरंजन सुधांशू,जमाबंदी आयुक्त
सध्या रोव्हर आणि कॉर्स नेटवर्कच्या साह्याने जिओ कॉरर्डिनेट स्वरूपात मोजणी करीत आहे. विभागाचा नकाशा (रेकॉर्ड) हे जमिनीवरील वस्तुस्थितीशी अचूक आहेत. जिओ रेफेरेंन्स केल्यावर मिळणारे परिणाम हे अचूक तर आहेतच परंतु नागरिकांना कायमस्वरूपी त्यांच्या जमिनीचे जिओ कॉरर्डिनेट मिळणार आहेत. यामध्ये पारदर्शकता, वेग आणि अचूकता यामुळे जास्तीत जास्त चांगल्या सेवा नागरिकांना देण्यात येणार आहेत.
-अनिल माने, उपसंचालक भूमि अभिलेख पुणे विभाग