पुणे – लालपरीचा डिझेलवरील प्रवास टप्याटप्याने सीएनजीवर येत असून राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागातील ६० एसटी बस सीएनजीवर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एसटी प्रशासनालाही त्याचा फायदा होत असून, टप्याटप्याने सर्व डेपोतील डिझेल बस आता सीएनजीवर करण्यात येणार असल्याचे पुणे विभागीय नियंत्रण कार्यालयाकडून सांगण्यात आले.
पुणे विभागात एकूण १४ आगार असून, दररोज हजारो प्रवासी या एसटीने प्रवास करतात. शिक्षण, नोकरी, व्यवसाया यासह पर्यटनासाठी प्रवाशांची हक्काची सेवा असलेली एसटी खऱ्या अर्थाने जीवनवाहीनी ठरत आहे. पुण्यातून राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रवाशी ये-जा करतात. एसटी महामंडळाच्या ताफ्यातील अनेक बस जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे महामंडळाने नव्याने इलेक्ट्रिक बस घेण्यावर भर दिला आहे. तसेच, प्रदूषण कमी करण्यासाठी डिझेलवरील बस सीएनजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे एसटी विभागाकडे साधारण ८०० बस आहेत. त्यापैकी साधारण ७०० ते ७५० बस मार्गावर धावतात. त्यामधील ५०० बस जुन्या झाल्या असून, त्या सर्व बस सीएनजीमध्ये रुपांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरवातीला प्रायोगीक तत्वावर एक बस सीएनजीवर केल्यानंतर विभागातील सर्व डिझेल बस सिएनजीवर रूपांतरीत करण्यास परवानगी देण्यात आली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात शिरूर आगारातील ३५ बस सीएनजीवर रुपांतरीत करण्यात आल्या आहेत.
तर राजगुरूनर येथील बसही सीएनजीवर रुपांतरीत केल्या असून, त्यासाठी साधारण १२ लाख ५० हजार रुपये खर्च येत आहे. बस पूर्णपणे तयार झाल्यानंतर तिची पुन्हा प्रादेशिक परिवहन विभागाकडे नोंदणी करावी लागत आहे. त्यानुसार ६० बसची नोंदणी करून त्या मार्गावर धावण्यास सुरूवात झाली आहे, अशी माहिती पुणे एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.