पुणे – दिवाळी सणानिमित्त घरोघरी विविध पदार्थ तयार केले जातात. यासाठी लागणाऱ्या जिनसांची मागणी वाढली आहे. यात प्रामुख्याने खाद्यतेल, साखर, शेंगदाणा, सुका मेवा यांसह फराळासाठी लागणाऱ्या विविध प्रकाराच्या वस्तूंची खरेदी वाढली आहे. मार्केटयार्डातील ग्राहक संख्येत सुमारे 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर खाद्यतेल, सुका मेवा आदीचे भाव वगळता उर्वरित वस्तूंच्या भावात वाढ झाली आहे.
दिवाळी फराळासाठी चनाडाळ, पोहे, रवा, मैदा, बेसन, खोबरे, भंडग, शेंगदाणा, खाद्यतेल, साखर, गुळ, मसाले, लाल तिखट आदी वस्तूंना मोठी मागणी असते. तसेच कंपन्या, विविध संस्था, संघटना आणि राजकीय मंडळींकडून भेट देण्यासाठी सुका मेव्याला मागणी असते. येत्या दोन दिवसांत आणखी खरेदीला वेग येणार असल्याने ग्राहक आणि खरेदीच्या प्रमाणात आणखी वाढ होऊ शकते, असा अंदाज व्यापारी नवीन गोयल, सुमीत गुंदेचा यांनी व्यक्त केला. यंदा सर्वच सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जात आहेत.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ग्राहकांचा प्रतिसाद आहे. त्यामुळे उलाढालही वाढली आहे. काही वस्तूंच्या दरात वाढ झाली आहे, तर काही वस्तूंचे भाव टिकून आहेत. सर्वसामान्य नागरिक दिवाळी उत्साहात साजरी करण्याच्या मूडमध्ये आहेत. खरेदी वाढल्याने व्यापाऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे. घाऊक बाजारातून शहर, उपनगर आणि जिल्ह्यातील अनेक छोटे-मोठे व्यापारी दिवाळी फराळासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी मार्केटयार्डातून करत आहेत.
“मागील वर्षीच्या तुलनेत विविध प्रकारच्या खाद्यतेलांच्या दरात वाढ झाली नाही. मागणीच्या तुलनेत आवक होत असल्याने दर स्थिर आहेत.”- रायकुमार नहार, व्यापारी
“नोकरदारांचा पगार झाला आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून बाजारात खरेदीचे प्रमाण वाढले आहे. येत्या दोन दिवसांत फराळाचे साहित्य, सुका मेका, तेल, साखर, शेंगदाणे आदी प्रकारच्या खरेदीसाठी ग्राहकांची संख्याही वाढणार आहे. दरवर्षी या साहित्याच्या खरेदीच्या प्रमाणात वाढ होत असते.”- प्रशांत गोते, गुळ-भुसार विभाग प्रमुख, मार्केट यार्ड
“सद्यस्थितीत राजस्थान आणि गुजरात या दोन राज्यांतून संपूर्ण देशात शेंगदाणे पाठविले जात आहेत. दिवाळीमुळे मागणी वाढताच मागील दोन दिवसांत शेंगदाणाच्या दरात किलोमागे 2 ते 3 रुपयांनी वाढ झाली आहे. दिवाळीपर्यंत ही वाढ टिकून राहणार आहे.” – अशोक लोढा, व्यापारी