पुणे – दिवाळी सण आणि पूजेचे साहित्य हे समीकरणच आहे. त्यामुळे दिवाळीतील पूजेसाठी ग्राहकांकडून विविध प्रकारच्या पूजेच्या साहित्याची खरेदी केली जात आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून महात्मा फुले मंडईसह अन्य ठिकाणी पूजेच्या साहित्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पूजेच्या साहित्याच्या दरात 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
दिवाळी सणाला सुरूवात झाली आहे. ग्राहकांकडून हळदी-कुंकू, खारीक, खोबरे, सुपारी, अगरबत्ती, धुप, वाती, तेल, रांगोळी अष्टगंध, विविध प्रकारची फुले, विड्याची पाने, खडी साखर, केळीचे खुंट, तुळशीची पाने, दुर्वा आदी प्रकारच्या साहित्याला मागणी आहे.
येत्या दोन दिवसांत पूजेच्या साहित्याच्या खरेदीत आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज विक्रेते व्यक्त करत आहेत. पूजेसाठीचे कापड, आर्टिफिशिअल फुले, हार, तोरण हेही विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पूजेच्या साहित्यांची किमत 20 रुपयांच्या पुढे आहे. पूजेच्या साहित्यांच्या खरेदीसाठी रविवार पेठेसह मंडईमध्ये लगबग पाहायला मिळत आहे. व्यावसायिक धनंजय घोलप म्हणाले, पूजेच्या साहित्यांच्या खरेदीला सुरुवात झाली आहे. यंदा पूजेसाठीच्या बॉक्सला जास्त मागणी आहे. इतर साहित्यांची खरेदीही लोक करीत आहेत. ग्रामीण भागातील लोकही खरेदीसाठी येत आहेत.
बॉक्सला मागणी
यंदा पूजेच्या साहित्यांच्या बॉक्सची सर्वाधिक मागणी आहे. बॉक्समध्ये हळदी-कुंकवापासून ते फुलवातींपर्यंतच्या अनेक साहित्यांचा समावेश आहे. या बॉक्सची किंमत 200 ते 400 रुपयांपर्यंत आहे. एकत्रितपणे पूजेचे साहित्य एकाच बॉक्समध्ये असल्याने या बॉक्सला मागणी वाढली आहे.
विक्रेतेही टेक्नोसॅव्ही
फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सऍपवर त्याबाबत प्रसिद्धी केली जात असून, छायाचित्रे, व्हिडिओच्या माध्यमातून प्रसिद्धी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, यावर्षी काही व्यावसायिकांनी पूजेचे साहित्य घरपोच पोचविण्यासाठीची सेवा उपलब्ध करून दिली आहे.