करोना विषाणूचा प्रसार समजण्यास मदत : कुलगुरूंची माहिती
पुणे – केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या पुणे नॉलेज क्लस्टरच्या (ज्ञान समूह) माध्यमातून शहराच्या रोगप्रतिकारक शक्तीचा आढावा घेण्यात येणार आहे. याद्वारे करोना विषाणूचा शहरातील प्रसार समजून घेण्यास मदत होऊ शकणार असल्याची चिन्हे आहेत. याला “इम्युनॉलॉजी सर्व्हे’ असे म्हटले जाते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. पुण्यातील शैक्षणिक, संशोधन संस्था आणि उद्योग जगताला एकत्र आणून केंद्र सरकारने पुणे नॉलेज क्लस्टरला मान्यता दिली आहे. देशातील एकूण चार शहरांमध्ये असे नॉलेज क्लस्टर आहेत. पुणे नॉलेज क्लस्टरमध्ये विद्यापीठासह भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर), आयुका, लष्करी वैद्यकीय महाविद्यालय, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, लष्करी संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) यांच्यासह काही कंपन्या, विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा सहभाग आहे.
सध्याच्या करोना विषाणू संसर्गाच्या काळात पुणे महापालिकेला सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी काम करण्यात येत आहे. त्या अंतर्गत करोनाचा शहरातील प्रसार, त्या अनुषंगाने प्रतिबंधित क्षेत्रे, निकष, त्याची अंमलबजावणी या बाबत मदत करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहराच्या रोगप्रतिकार शक्तीचा आढावा घेतला जाणार आहे. करोना विषाणू संसर्गासंदर्भातील डाटा महापालिकेने उपलब्ध करून दिला आहे.
अशी करणार तपासणी
करोनाबाधित म्हणून नोंद असलेल्या व्यतिरिक्त विविध भागांतील अन्य नागरिकांचे रॅंडम पद्धतीने रक्त नमूने घेतले जात आहेत. त्यातून नागरिकांच्या शरीरात प्रतिपिंड (अँटिबॉडीज) तयार झाल्या आहेत का, हे तपासले जाईल. असे प्रतिपिंड आढळल्यास त्यांना करोनाची लागण होऊन गेल्याचे स्पष्ट होईल. त्यामुळे संसर्गाचा प्रसार कशा पद्धतीने, कोणत्या भागांमध्ये झाला हे समजून घेता येईल. त्याशिवाय कचऱ्याच्या माध्यमातून संसर्ग पसरू शकतो का, याचाही अभ्यास करण्यात येईल. दोन वेळा अशी पाहणी केली जाणार आहे, असे कुलगुरू डॉ. करमळकर यांनी स्पष्ट केले.