विश्रांतवाडी – ‘सुरेंद्र पठारे फाऊंडेशन’च्या वतीने २७ ऑक्टोबर ते १७ डिसेंबर या कालावधीत पार पडणाऱ्या ‘एसपीएफ स्पोर्ट्स मेनिया २०२३’ या क्रीडा महोत्सवात २ व ३ डिसेंबरला व्हॉलीबॉल चॅम्पियनशीप, टेबल टेनिस चॅम्पियनशीप, कॅरम चॅम्पियनशीप, बॉक्स फुटबॉल चॅम्पियनशीप, स्विमिंग चॅम्पियनशीप तसेच स्केटिंग चॅम्पियनशीप या विविध स्पर्धा झाल्या.
खराडी येथील स्पोर्टसेज, पठारे स्टेडियम, फाउंटेन रोड या ठिकाणी या स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. या सर्वच स्पर्धांमध्ये खराडी, विमाननगर, कल्याणीनगर, वडगावशेरी, धानोरी, येरवडा, लोहगाव येथील विविध सोसायटीतील संघांनी व खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. शहरात क्रीडा संस्कृती रुजावी तसेच अनेक उदयोन्मुख खेळाडू तयार व्हावेत त्यांनी राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध क्रीडा स्पर्धांमध्ये नावलौकिक मिळावा, या उद्देशाने हा क्रीडा महोत्सव यशस्वीरित्या सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
एकूणच एसपीएफ क्रीडा महोत्सवात सर्वच संघांनी व खेळाडूंनी आपल्या कौशल्यपूर्ण खेळाचे उत्तम प्रदर्शन करत सामान्यांमध्ये रंगत आणली. नागरिकांना या निमित्ताने चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. ‘एसपीएफ स्पोर्ट मेनिया’च्या रूपाने मैदानी क्रीडा प्रकारांसह बुद्धिबळ, कॅरम अशा स्पर्धांचेही आयोजन होत असल्याने क्रीडाप्रेमी प्रेक्षकांसाठी व खेळाडूंसाठी ही एक पर्वणी ठरत आहे.
चॅम्पियनशीप स्पर्धा
क्रीडा प्रकार आणि स्पर्धक संख्या
व्हॉलीबॉल : ३००
टेबल टेनिस : २५०
कॅरम : २३०
बॉक्स फुटबॉल : ६००
स्विमिंग : २५०
स्केटिंग : ५००
” ज्या उद्देशाने हा क्रीडा महोत्सव आयोजित केला आहे तो उद्देश येणाऱ्या काळात नक्की सफल होईल, यात शंका नाही. आजही ‘एसपीएफ स्पोर्ट्स मेनिया’ मधून तसेच फाऊंडेशनच्या माध्यमातून राबवलेल्या विविध क्रीडा उपक्रमांतून पुढे आलेले खेळाडू विविध स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत आहेत.” – सुरेंद्र पठारे, फाउंडेशनचे अध्यक्ष