धीरेंद्र गायकवाड
कात्रज – कात्रज-कोंढवा बाह्यवळण रस्त्यावर खडीमशीनच्या दिशेने जात असताना सिमेंटचे पाइप भरून घेऊन जाणाऱ्या ट्रकचे ब्रेक निकामी झाल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला तर पाच नागरिक जखमी झाले. दैवबल्वत्तर म्हणून 40 विद्यार्थी सुखरुप बचावले.
या अपघातानंतर या रस्त्याच्या रखडलेल्या कामाबाबत तसेच महापालिकेकडून रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याबाबत चालढकल होत असल्याच्या कारणातून स्थानिक तसेच परिसरातील नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. आयुक्त विक्रम कुमार यांनी मंगळवारी (दि.8) या रस्त्याची पाहणी करीत रूंदीकरणासाठी जागा भूसंपादन तसेच मार्च 2024 अखेरपर्यंत या रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम पूर्ण करण्याच्या आश्वासनांचा पुनरुच्चार केला असला तरी पालिका प्रशासन “ऍक्शन मोड’मध्ये येण्यासाठी नक्की किती वेळ लागणार, याबाबत नागरिकांकडून शंका व्यक्त केली जात आहे.
कात्रज-कोंढवा रस्ता रूंदीकरणाचा प्रश्न रेंगाळल्याने गेल्या काही वर्षांत अनेक अपघात झाले आहेत. “ऍक्शन मोड’मध्ये आलेल्या महापालिकेने यापूर्वीच या रस्ता रूंदीकरणाचे काम पूर्ण करणे गरजेचे होते. परंतु, शासकीय लालफितीत काम अडकल्याने या कालावधीत अपघात होऊन अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत, याची जबाबदारी महापालिका घेणार का? असाही प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
सध्याच्या कामाची स्थिती…
कात्रज-कोंढवा रस्त्यावरील शत्रुंजय मंदिर चौक ते एसबीआय बॅंक, शत्रुंजय मंदिर चौकाच्या पलिकडे गगन उन्नती इमारतीजवळ, टिळेकरनगर रस्ता ते भैरोबा नाला येथील सेवा रस्त्याचे काम झाले आहे. ग्रेड सेप्रेटरचे काम पूर्ण झालेले नाही. पॅरामाऊंट सोसायटी, राज सोसायटी येथील सेवा रस्ता पूर्ण झाला आहे. गगन उन्नती ते टिळकनगर रस्ता यामध्ये रस्ता रुंदीकरणासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. एक ते दीड महिन्यांत ते काम होऊ शकते. सध्या सव्वा किलोमीटरच्या रस्त्याचे म्हणजे सुमारे 35 टक्के काम पूर्ण झाले आहे.
“कात्रज-कोंढवा रस्ता रूंदीकरणासाठी आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी केली आहे. चार महत्त्वाच्या जागांसाठीची अडचण संपली आहे, आता केवळ एका जागेचा प्रश्न राहिला आहे. तो देखील लवकरच मार्गी लागेल. रस्त्याचे काम वेगाने पूर्ण करण्याचा प्रशासनाच प्रयत्न आहे.” – विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका
निधी आला तरी…यामुळे होऊ शकतो विलंब
राजस सोसायटी ते एसबीआयपर्यंत नागरिकांची घरे आहेत. त्यांची जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. रहिवाशांना एफएसआय, टीडीआरपेक्षा रोख रक्कम मिळण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडे, शत्रुंजय मंदिर चौकातून वाहतूक सुरू ठेवण्यासाठी रस्ता उपलब्ध करून देण्याशिवाय पर्याय नसल्याने संपूर्ण चौकात खोदाईचे काम करणे शक्य नाही. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम 2024 मध्ये पूर्ण होईल, असे स्पष्ट केले असले तरी प्रत्यक्षात कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम पूर्ण होण्यास वेळ लागू शकतो.