पिंपरी – नाशिक फाटा येथील भारतरत्न जेआरडी टाटा उड्डाणपुलावरून पिंपळे सौदागरकडे जाताना बीआरटी मार्गे हॉटेल क्रिस्टल ते ट्रॉइस सोसायटी या 18 मीटर रस्त्याच्या कामाला संरक्षण विभागाने हिरवा कंदील दाखविला आहे.
या रस्त्यामुळे काटे वस्ती, ट्रॉइस सोसायटी आणि रगतच्या भागातील वाहतूक कोंडी कायमची सुटणार आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते संदीप काटे यांनी दिली. पिंपळे सौदागरचा काही भाग लष्कराच्या हद्दीलगत येतो. येथील काटे वस्ती आणि आजूबाजूच्या परिसरात नागरीकरण झाल्यामुळे रस्त्याची रुंदी कमी आहे. स्वराज हॉटेलसमोरून गोविंद गार्डन, काटे वस्ती, ट्रॉईस सोसायटी यांना जोडणारा 18 मीटर रुंद रस्ता पालिकेच्या विकास आराखड्यात आहे. मात्र, नऊ मीटर रुंद व 600 मीटर लांब रस्ता लष्कर हद्दीत येतो. त्यामुळे हा रस्ता मागील अनेक वर्षे रखडला आहे. रस्त्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संदीप काटे यांनी संरक्षण विभागाशी पत्रव्यवहार करून जागेची मागणी केली. मात्र, त्याला अपयश आले. प्रसंगी कोर्टाची पायरी चढावी लागली. अखेरीस संरक्षण विभागाने रस्त्याची जागा देण्यास तयारी दाखवली.
सध्या नाशिक फाट्याकडून काटे वस्ती, कुणाल आयकॉन रस्त्याकडे जाणारी वाहने गोविंद गार्डन चौक व कोकणे चौकातून जातात. मात्र, या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यास गोविंद गार्डन चौक व कोकणे चौक रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होईल. तसेच, हिंजवडी व वाकडकडे जाणाऱ्या वाहनांसाठी हा मार्ग सोईचा होईल, असेही काटे यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
पालिका अधिकाऱ्यांची केंद्राच्या संरक्षण खात्यातील अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. संरक्षण खात्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. याचा प्रस्ताव अधिकाऱ्यांनी आयुक्तांकडे पाठवला आहे. आता रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जागा पालिकेकडे हस्तांतरित होईल. रस्त्यासाठी पाठपुरावा करताना दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी सहकार्य केले. आता भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप हे देखील पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.
– संदीप काटे, सामाजिक कार्यकर्ते