पुणे – चेन्नई एक्स्प्रेसमधून 279 कासव, 1207 इग्वाना (सरडे) आणि 230 बेटा फिश माशांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या दोघांना लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाने अटक केली. ते चेन्नईहून मुंबईला हे प्राणी घेऊन जात होते. त्यानंतर ते परदेशात पाठवणार असल्याचा संशय आहे. वन्यजीवांची ही संख्या आणि प्रजाती पाहून यामागे आंतरराष्ट्रीय रॅकेट असण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.
तरुणकुमार मोहन (26,रा. लेनीननगर, अंबतूर, चेन्नई) आणि श्रीनिवासन कमल(20, रा. कोल्लातूर, तमिळनाडू) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे गाड्यांतून विनापरवाना मालाची व प्राण्यांची तस्करी होत असल्याची खबर लोहमार्ग पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मौला सय्यद यांना सुचना देऊन रेल्वेगाड्यांवर पेट्रोलिंग करण्यास सांगितले होते. त्यानुसार मागील आठ ते दहा दिवसापासून पथके गस्तीवर होती.
पुणे ते लोणावळा दरम्यान चेन्नई एलटीटी एक्सप्रेसमधील ए/1 बोगीमधून प्रवास करणारे दोघे संशयास्पदरित्या बसलेले आढळले. त्यांच्याकडे असणाऱ्या चार ट्रॅव्हल बॅग व दोन सॅकची तपासणी केली. त्यामध्ये कासव, इग्वाना व फायटर फिश सापडले. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा वाहतूकीचा परवाना व कागदपत्रे नसल्याने दोघांना त्यांच्या बॅंगांसह ताब्यात घेण्यात आले.
एवढ्या मोठ्या संक्येने प्राणी सापडल्यामुळे ते कोणत्या प्रजातीचे आहेत, हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी वन खात्याची मदत घेतली. बावधन येथील रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेतील पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही अफ्रिकन स्पुरेंड टॉर्टोइस जातीची कासव आहेत. इग्नावा हा सरड्यासारखा प्राणी आहे.
या तस्कारांकडे कासवे, इग्वाना, बेटा फिश सापडले आहेत. त्यांच्या सरंक्षणासाठी त्यांना तेथेच जमा करण्यात आले आहेत. हे प्राणी परदेशी प्रजातीचे असल्याने व या तस्करांनी कोणतेही सीमा शुल्क विभागाची परवानगी न घेता वाहतूक केल्याने दोघांना पुढील कारवाईसाठी सीमा शुल्क विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या तस्करांनी हे प्राणी प्लॉस्ट्रिकच्या कंटेनरमध्ये ठेवले होते. त्या प्लॉस्टिक कंटनेरला हवेसाठी छिद्रे पाडली होती. ही कामगिरी पोलीस अधीक्षक सदानंद वायसे -पाटील, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर -पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्ष मौला सय्यद, सहायक निरीक्षक अंतरकर, सहायक फौजदार सुनील भोकरे, जगदीश सावंत, कर्मचारी सुनील कदम, सुहास माळवदकर, दिनेश बोरनारे, फिरोज शेख यांच्या पथकाने केली.