पुणे – “म्युकरमायकोसिस’च्या रुग्णांना इंजेक्शन आणि औषधीसाठी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात गर्दी होत आहे. त्यामुळे आता या कार्यालयातून खासगी रुग्णालयांना करण्यात येणारे वितरण बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतला.
त्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून केवळ सरकारी रुग्णालयांना पुरवठा केला जाणार असून, या कार्यालयाकडे शिल्लक राहणारा औषधांचा साठा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून खासगी रुग्णालयांना वितरित होणार आहे.
“म्युकरमायकोसिस’च्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने इंजेक्शन, औषधांचा काळाबाजार होऊ नये, म्हणून खासगी रुग्णालयांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रणाखाली वितरण करण्यात येत आहे. सरकारी रुग्णालयांना जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून वितरण केले जाते.
सरकारी रुग्णालयांमध्ये “म्युकरमायकोसिस’चे रुग्ण तुलनेने कमी असल्याने सरकारी रुग्णालये आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी पुरेसा औषधांचा साठा राखून ठेवल्यानंतर उर्वरित साठा जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून खासगी रुग्णालयांना देण्याचे यापूर्वी ठरवण्यात आले होते.
निश्चित केलेल्या किमतीनुसार इंजेक्शनची रक्कम डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ ऍन्ड फॅमिली वेल्फेअर सोसायटी यांच्याकडे भरण्याची सूचना देण्यात आली होती. मात्र, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात रुग्णांच्या नातेवाईकांची गर्दी होत असल्याने हा निर्णय रद्द करून जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडील शिल्लक औषधांचा साठा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून दररोज सकाळी 11 वाजता शिल्लक औषधांचा साठा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात येणार आहे. तो खासगी रुग्णालयांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वितरित होणार आहे.