पुणे – आयपीएन सट्टेबाजीच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटमध्ये सहभागी “ललित’कथेतील बुकीच्या पोलिसांतील टीपरची चर्चा बुधवारी शहरभर सुरू होती. दरम्यान, संबंधित बुकीने या प्रकरणातून सहीसलामत सुटण्यासाठी राजकीय नेत्यांचे चरण धरल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सट्टेबाजीच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटमध्ये सहभागाचा संशय असणाऱ्या एका बुकीला त्याच्या घरावर छापा टाकण्याआधीच पोलिसांतील टीपरने माहिती दिल्याची माहिती दै. “प्रभात’ने प्रसिद्ध केली होती. याची पोलीस दलात जोरदार चर्चा रंगली होती. वरिष्ठ पोलीस अधिकारी टीपरचा कसून शोध घेत आहेत. तर टीप देणारेदेखील धास्तावले आहेत. इकडे बुकीही संकटातून मार्ग काढण्यासाठी दिवसभर धावाधाव करताना दिसत होता.
वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच राजकीय नेते यांच्याकडे मनधरणी करण्याचे त्याचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष प्रयत्न सुरू होते. शहरातील विरोधी पक्षातील बड्या नेत्याचा त्याला वरदहस्त आहे. त्याच्याच चरणी त्याने साकडे घातल्याचे बोलले जात आहे.
या व्यतिरिक्त आयपीएलवर सट्टा लावणारे इतरही बडे बुकी आहेत. त्यांचीही धावाधाव सुरू झाली आहे. पोलिसांची वक्रनजर आपल्यावर पडू नये, म्हणून ते मर्जीतील अधिकारी व मध्यस्थांमार्फत प्रयत्न करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.