वाई -वाईच्या तत्कालिन मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांच्या अडचणीत वाढ होणार का, असा प्रश्न वाईकरांना पडला आहे. प्रशासकीय कामकाजामध्ये जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याबाबत विद्यादेवी पोळ यांच्यावर खातेनिहाय कारवाई सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव वाईच्या प्रांताधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी वरिष्ठांना सादर केला असल्याचे खात्रीशीर वृत्त असताना खातेअंतर्गत कारवाई करण्याबाबत वरिष्ठांकडून दिरंगाई होत असल्याबद्दल वाईकर नागरिकांमधून प्रश्न उपस्थित होत आहे.
नगर विकास विभागाकडून प्रशासकीय कामकाजात भ्रष्टाचाराच्या चौकशीचा ससेमिरा पोळ यांच्यामागे सुरू असतानाच वाई प्रांताधिकाऱ्यांकडून पाठवलेल्या खातेनिहाय कारवाईच्या चौकशीच्या नोटीशीने विद्या पोळ यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली खरी. परंतु, वरिष्ठ कार्यालयामार्फत चौकशीत दिरंगाई होत असल्याने प्रशासन प्रशासकीय कर्मचाऱ्यांना एक प्रकारे पाठीशी घालत असल्याची शंका व्यक्त होत आहे.
प्रशासकीय कामकाजामध्ये जाणूनबुजून दुर्लक्ष करताना पोळ गांभीर्याने कामकाज करीत नाहीत, असे वाई प्रांतांनी दिलेल्या नोटिसीमध्ये म्हटले आहे. विविध मान्यवरांच्या कार्यक्रम दौरा झाला असताना मुख्याधिकारी या नात्याने पोळ यांच्याकडून राजशिष्टाचार म्हणून आवश्यक कार्यावाहीबाबत हजर न राहणे तसेच मान्यवरांच्या दौऱ्यादरम्यान वाई नगरपरीषदेच्या हद्दीतील रस्त्यावरून खड्डे, साईडपट्ट्या दुरुस्त करणे, स्वच्छता करणे याबाबत कार्यवाही झाली नसल्याचे दिसून आले आहे.
प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने कार्यालयात घेण्यात आलेल्या वेगवेगळ्या बैठकीदरम्यान हजर राहण्याचे लेखी कळवूनसुध्दा सतत गैरहजेरीमुळे पोळ प्रशासकीय कर्तव्यात हलगर्जीपणा करत असल्याचे स्पष्ट मत नोटीशीत व्यक्त केले आहे. वरील सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करता पोळ यांच्याविरोधात खातेअंतर्गत कारवाई सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठांना पाठवण्यात येणार असल्याचे नोटीशीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, मुख्याधिकारी पोळ यांच्याविरोधात तत्कालीन उपनगराध्यक्ष व सध्या नगराध्यक्ष असलेले अनिल सांवत यांच्या तक्रारीवरुन विविध कामांमध्ये अनियमितता व कर्तव्यात कसूर केल्याबाबत चौकशी सुरु असतानाच पोळ यांची खातेनिहाय कारवाई सुरु करण्याचा वरिष्ठांना सादर प्रस्तावातील प्रातांच्या नोटिसीमुळे अडचणीत वाढ झाली असली तरी खातेनिहाय चौकशी कधी होणार हा मात्र कळीचा मुद्दा ठरला आहे.