पुणे- करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काम करताना मृत्युमुखी पडलेल्या ठेकेदाराकडील तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना 50 लाखांचे विमा कवच अथवा सानुग्रह अनुदान देण्याचे आदेश राज्य शासनाने काढले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या करोनाकाळात मृत्युमुखी पडलेल्या कामगारांसह या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनाही मदत मिळणार आहे. दरम्यान, शासनाने याबाबतचे आदेश काढले असले तरी अद्याप महापालिकेकडून याबाबत निर्णय घेण्यात आलेला नसल्याचे समोर आले आहे.
केंद्र शासनाने 28 मार्च 2020 मध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी विमा कवच योजना लागू केली होती. त्याअंतर्गत करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर अथवा वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास 50 लाखांचा विमा कवच योजना जाहीर केली. त्यात, शासनाने वाढ करत वैद्यकीय व आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांसह साथीच्या काळात करोना बाधितांचे सर्वेक्षण, शोध, त्यांचा माग काढणे, चाचणी केंद्र, अशा वेगवेगळ्या ठिकाणी काम करताना मृत्यू झाल्यास 50 लाखांचे सानुग्रह अनुदान अथवा विमा कवच जाहीर केले होते.
महापालिकेकडूनही या दोन्ही योजनांची अंमलबजावणी केली जाते. मात्र, या योजनेत केवळ शासकीय कर्मचाऱ्यांचा समावेश होतो. मात्र, शासकीय कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त या कामासाठी कंत्राटी, ठेकेदारांकडून तसेच रोजंदारीवर घेतलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश नव्हता ही बाब लक्षात घेऊन शासनाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वनिधीतून शासनाच्या निकषानुसार, या कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 50 लाखांची मदत देण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील “अ’ वर्ग आणि “ब’ वर्गाच्या महापालिकांनी निर्णयाची अंमलबजावणी करावी, असे आदेश शासनाने दिले आहेत.
पुण्यात सात खासगी कामगारांचा मृत्यू
शहरात आतापर्यंत महापालिकेच्या 835 कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली असून त्यातील 88 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 81 कायमस्वरुपी कर्मचारी असून 7 कंत्राटी कर्मचारी आहेत. यातील 3 कर्मचारी केंद्राच्या 50 लाख रुपयांच्या विमा योजनेस पात्र झाले आहेत.तर, पालिकेकडून टप्प्याटप्प्याने उर्वरीत कर्मचाऱ्यांना 25 लाखांची मदत तसेच एका वारसाला महापालिकेत नोकरी दिली जात आहे. मात्र, अद्याप कंत्राटी कर्मचाऱ्यांना मदत देण्यात आलेली नाही. मात्र, शासनाच्या या आदेशाने या कर्मचाऱ्यांना मदत मिळू शकणार आहे. मात्र, अद्याप महापालिकेकडून त्याबाबत कोणतीही हालचाल करण्यात आलेली नाही.