पुणे – पेशव्यांचे सरदार म्हणून नावाजलेले सरदार मुजुमदार यांच्या वाड्यातील गणेशोत्सवाला भाद्रपद शुद्ध प्रतिपदेपासून म्हणजेच शनिवारपासून (16 सप्टेंबर) सुरुवात झाली. गणेशोत्सवाचे यंदाचे हे 309 वे वर्ष असून, पंचधातूच्या दशभुज वल्लभेष गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. उत्सव काळात दररोज सायंकाळी पाच ते सात या वेळात मुजुमदार वाडा पाहण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे.
देशभरातील ज्येष्ठ गायक-वादक आणि कीर्तनकारांनी गणराया चरणी आपली सेवा रूजू केली, अशा सरदार मुजुमदार वाड्यातील या गणेशोत्सवाला भाद्रपद शुद्ध प्रतिपदेपासून गणरायाची प्रतिष्ठापना करून प्रारंभ होतो. ऋषीपंचमीला लळीत आणि तीर्थप्रसादाचे कीर्तन होऊन या उत्सवाची सांगता होते.
मुजुमदार यांच्या देवघरातील पंचधातूची गणेशमूर्ती शनिवारी वाजतगाजत दिवाणखान्यामध्ये आणण्यात आली. विधिवत पूजा करून मयूरासनाच्या मखरामध्ये गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यंदाच्या उत्सवामध्ये पुंडलिक हळबे, श्रेयस बडवे, वासुदेव बुरसे, मोरेश्वर जोशी आणि शेखर व्यास हे सेवा रुजू करणार आहेत, तर रोज सकाळी नऊ वाजता प्रमोद गायकवाड यांचे सनईवादन होणार आहे. पंचमीला लळिताचे कीर्तन आणि तीर्थप्रसादाचा कार्यक्रम झाल्यानंतर गणेशमूर्तीवर पडदा टाकून विसर्जन होते. दुसऱ्या दिवशी ही मूर्ती पुन्हा देवघरामध्ये ठेवली जाते, असे प्रताप मुजुमदार यांनी सांगितले.
मुजुमदार वाड्याची परंपरा
शनिवारवाड्याजवळील सरदार मुजुमदार यांचा वाडा म्हणजे कलाकारांचे आश्रयस्थान होते. रसिकाग्रणी सरदार आबासाहेब मुजुमदार यांच्यासमोर कला सादर करून त्यांची दाद मिळवणे हे कलाकारांसाठी महत्त्वाचे असायचे. मुजुमदार यांच्या वाड्यातील गणेशोत्सवामध्ये कला सादरीकरणाची संधी ही त्या कलाकारासाठी पर्वणी असे. आबासाहेबांचे नातू प्रताप मुजुमदार आणि नातसून अनूपमा मुजुमदार यांनी ही परंपरा जतन केली आहे.
“गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे शनिवारी सरदार आबासाहेब मुजुमदार यांचा पन्नासावा स्मृतिदिन होता. सरदार आबासाहेब मुजुमदार यांच्या स्मृतिदनानिमित्त दि. 2 ऑक्टोबर रोजी संगीत क्षेत्राचा आणि दि. 8 ऑक्टोबर रोजी इतिहास क्षेत्रातील पुरस्कार प्रदान कार्यक्रम सरदार मुजुमदार वाड्यामध्येच होणार आहे.” – अनुपमा मुजुमदार, सरदार आबासाहेब मुजुमदार यांच्या नातसून