मुंबई – यंदाच्या गणेशोत्सवात घरगुती गणेशमूर्ती पर्यावरणपूरक असणे, मुंबई महापालिकेकडून बंधनकारक करण्यात आले आहे. शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती घडविण्यासाठी मूर्तिकारांना प्रत्येक विभागात एक जागाही मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहेत. याबाबत मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी निर्देश दिले आहेत. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तीना पर्यावरणपूरक पर्याय देण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्याची घोषणा बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. चार फूट उंच घरगुती गणेशमूर्ती शाडूची माती किंवा पर्यावरणपूरक घटकांपासूनच घडविणे बंधनकारक करण्यात आले आहे. या वेळी महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी शाडूच्या मातीच्या मूर्तीला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे आता ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तीवर बंदी घालण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
मात्र या बैठकीत सार्वजनिक मंडळांच्या मूर्तीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. परंतु गेल्या वर्षी मंडप शुल्क माफ करण्यात आले होते, त्यापूर्वी जे शुल्क आकारले गेले ते मंडळांना परत करण्याची कार्यवाही तातडीने करण्याच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. कृत्रिम तलाव वाढावेत, पर्यावरणपूरक उत्सवासाठी जास्तीत जास्त स्पर्धा घ्याव्यात, चांगली पारितोषिके द्यावीत यासाठी नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीतील प्रदूषणकारी घटक कमी करणे अथवा इतर काही पर्याय उपलब्ध करण्यासंदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची आज घोषणा केली, सह्याद्री अतिथीगृह येथे मुंबई तसेच कोकणातील मूर्तिकार, सार्वजनिक गणेश मंडळांच्या… pic.twitter.com/3fdu5PB1Hm
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 17, 2023
मोफत जागा उपलब्ध करणार
शाडूच्या मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांना जागेची कमतरता पडू नये. यासाठी मूर्तिकारांना लिकेच्या प्रत्येक विभागात एक जागा मोफत उपलब्ध करून देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्यास प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने शाडू माती उपलब्ध करून देण्याचेही निर्देश आयुक्तांकडून परिमंडळीय उपायुक्तांना दिले आहेत. यासाठी राज्यातील विविध भागातून किंवा अन्य राज्यातून शाडूची माती आणून त्याचा मूर्तिकारांना पुरवठा करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.