पुणे – वीज जाण्याची माहिती आता एसएमएसद्वारे

पुणे – महावितरणकडून पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्तीसाठी वीजपुरवठा बंद राहणार असल्याचा कालावधी, नैसर्गिक आपत्ती, तांत्रिक बिघाड किंवा विविध कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याची व वीजपुरवठा पूर्ववत होण्याचा संभाव्य कालावधी, दरमहा वीजबिलाची रक्कम, देय दिनांक आदींचा तपशील, मीटर रीडिंग घेण्याची तारीख व कालावधी, मीटर रीडिंग घेतल्याची तारीख व एकूण युनिटचा वापर, वीजबिलाची मुदत उलटून गेल्यास त्यासंबंधीची माहिती आता वीजग्राहकांना एसएमएस द्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे. पुणे परिमंडलातील 27 लाख 49 हजार ग्राहकांनी त्यांचे मोबाइल क्रमांकांची नोंदणी केली आहे.

“एसएमएस’द्वारे मिळालेल्या वीजबिलाच्या तपशिलावरून वीजग्राहकांना देयकाचा भरणा करणे शक्‍य झाले आहे. महावितरणच्या वीजबिल भरणा केंद्रात ‘एसएमएस’ दाखवून वीजबिलाचा भरणा करण्याची सोय उपलब्ध झालेली आहे. तसेच वीजग्राहकांच्या मागणीनुसार मराठी भाषेतून सुद्धा ‘एसएमएस’ उपलब्ध आहे. पुणे परिमंडल अंतर्गत पुणे, पिंपरी चिंचवड शहर तसेच मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर, वेल्हे तालुक्‍यात एकूण 29 लाख 26 हजार वीजग्राहक आहेत. यापैकी 93.92 टक्के ग्राहकांनी मोबाइल क्रमांकाची नोंदणी केलेली आहे.

महावितरणच्या 9225592255 या क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे. उर्वरित वीजग्राहकांनी नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून 9225592255 क्रमांकावर चठए(स्पेस)(बारा अंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाईप करून “एसएमएस’ केल्यास मोबाइल क्रमांकाची नोंदणी होते. याशिवाय 24 बाय 7 सुरू असणाऱ्या कॉल सेंटरचे 1912 किंवा 18001023435 आणि 18002333435 हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहे. याशिवाय संकेतस्थळावरून किंवा महावितरण मोबाइल ऍपद्वारे मोबाइल क्रमांक नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे.

भाडेकरूंनाही सुविधा
काही वीजवापरकर्ते हे भाडेकरू म्हणून राहत आहेत. परंतु त्यांच्या ग्राहक क्रमांकासोबत घरमालकाच्या मोबाइल क्रमांकाची नोंदणी केल्याचे प्रामुख्याने वाघोली, हिंजवडी, वाकड, सांगवी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, विश्रांतवाडी, विमाननगर, खराडी आदी परिसरात दिसून येत आहे. त्यामुळे महावितरणकडून येणारे “एसएमएस’ हे घरमालकाच्या मोबाइलवर जात आहेत व प्रत्यक्षात भाडेकरूंना वीजसेवेबाबत माहिती उपलब्ध होत नाही. त्यामुळे वीजवापरकर्त्यांनीच किंवा भाडेकरूंनी संबंधित ग्राहक क्रमांकासोबत मोबाइल क्रमांकाची नोंदणी करावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)