पुणे – पीएमपीकडून स्वमालकीच्या शंभर सीएनजी बस खरेदी प्रक्रियेला सरुवात झाली आहे. या बस लवकरच ताफ्यात येतील. तसेच भाडेतत्वावरील ४०० सीएनजी बसची खरेदी प्रक्रियाही सुरू होणार असल्यामुळे पीएमपीच्या ताफ्यात बसची संख्या वाढणार आहे.
पीएमपीच्या ताफ्यात एकूण २ हजार ८९ बस आहेत. या बसच्या माध्यमातून पुणे, पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीएच्या हद्दीत सेवा दिली जाते. पीएमपीच्या ताफ्यातील ५९३ बसेसला १२ वर्षे पूर्ण होत असल्यामुळे येत्या काही महिन्यांत त्या कालबाह्य होणार आहेत. त्यामुळे पीएमपीच्या ताफ्यातील बसची संख्या खूपच कमी होणार आहे. त्या दृष्टीकोनातून पीएमपीने पहिल्या टप्प्यात १०० सीएनजी स्वमालकीच्या बसची खरेदी प्रक्रिया सुरू केली आहे. त्याची निविदा सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. येत्या काही महिन्यांत अधिक प्रक्रिया होणार आहे.
तसेच भाडेतत्वावरील ४०० बसची खरेदी केली जाणार असून, पीएमपीच्या संचालक मंडळाने त्याला नुकतीच मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच पहिल्या टप्प्यात ५०० सीएनजी बस येणार असल्यामुळे पीएमपीला दिलासा मिळाला आहे. दरम्यान, सीएनजीबरोबरच ६५० ई-बस खरेदी करायच्या होत्या. त्यापैकी १७७ बस येणे अद्याप बाकी आहे. त्या बसची देखील खरेदी प्रक्रिया सुरू आहे. या बस काही महिन्यात पीएमपीला मिळण्याच शक्यता आहे. तर, संचालक मंडळाच्या बैठकीनुसार १०० ई-बस खरेदी केल्या जाणार आहेत. त्यापैकी २० बस या डबल डेकर असतील.