विरोधी पक्ष नेत्या दीपाली धुमाळ यांची मागणी; आयुक्तांना निवेदन
पुणे – करोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी आवश्यक असलेली तयारी महापालिकेने केवळ कागदावरच केली. त्यामुळे बाधितांना बेड मिळत नसल्याने त्यांची हेळसांड सुरू आहे. करोना प्रतिबंधात्मक उपाय योजना नियोजनासाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घ्यावी, अशी मागणी महापालिकेच्या विरोधी पक्ष नेत्या दीपाली धुमाळ यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.
करोनामुळे पुणेकरांत भीतीचे वातावरण आहे. शहरात बहुतांश मध्यमवर्गीय व गोरगरीब नागरिक असून, काही ठिकाणी एका कुटुंबात 6 ते 10 नागरिक राहतात. घरातील एक व्यक्ती बाधित झाली, तरी वयोवृद्धांची काळजी घेणे क्रमप्राप्त ठरते.
सध्या बाधित व्यक्तीला होम क्वारंटाइन करण्यात येत आहे. परंतु एका घरात साधारण 5-6 जण राहत असल्याने बाधिताला होम आयसोलेशन करणे सर्वांनाच शक्य होत नाही. यासाठी महानगरपालिकेने कोविड केअर सेंटर्स पूर्वीप्रमाणे सुरू करावेत, अशी मागणी धुमाळ यांनी पत्राद्वारे केली आहे.
संसर्गावर नियंत्रण करावे : सुतार
शहरात करोनाचे बाधित वाढत असतानाही प्रशासन कागदोपत्री कारभार करत असून, खासगी रुग्णालयात बेड्सची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे गटनेते सुतार यांनीही पत्राद्वारे आयुक्तांकडे केली आहे. जम्बो रुग्णालयाची क्षमता वाढवावी, खासगी रुग्णालयांसोबत मोफत उपचारासाठी बेड्स सुविधा द्यावी, तसेच डॅशबोर्डवर अपडेट आणि उपलब्ध बेड्सची बरोबर माहिती असावी, स्वॅब सेंटरवरच होम क्वारंटाइन व्यक्तींना पत्र तसेच औषधे देण्याची सुविधा असावी. सर्व कोविड केअर सेंटर्स सुरू करावीत, अशी मागणी सुतार यांनी आपल्या निवेदनात आयुक्तांकडे केली आहे.