पुणे – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर तो निर्णय मागे घेतला. पवार यांनी भाजपबरोबर सरकार स्थापनेबाबत पूर्वी चर्चाही केल्या होत्या. पवारांनी सतत तळ्यात, मळ्यातची भूमिका घेतली, असे म्हणत कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत शरद पवार यांच्यावर पुन्हा टीका केली.
आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रसमध्येच असून भाजपमध्ये सामील झालेलो नाही. आमची भूमिका आम्ही सोडलेली नाही. महात्मा फुले समता परिषदेचे विचार व कार्य कधीच सोडणार नाही. आमच्या निलंबनाबाबत आता कायदेशीर लढाई सुरू झाली असल्याचेही त्यांनी नमूद केले. मंत्रालयात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा लावण्याची मागणी फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यांनी ती तत्काळ मान्य केली.
ओबीसीचे आरक्षण टिकले पाहिजे, असा आग्रहही फडणविसांकडे धरला होता. त्यानुसार त्यांनी सहकार्यही केले, असे म्हणत भुजबळ यांनी फडणविसांच्या कार्याचे कौतुक केले. अलीकडच्या काळात काही घटना घडल्या. त्याचा उलगडा अजित पवार यांनीच केला असल्याचेही भुजबळ यांनी नमूद केले.