करोनाबाधित मुलांवरील उपचारासाठी केंद्राची मार्गदर्शक तत्त्वे जारी
पुणे – करोनाबाधित लहान मुलांच्या (चाइल्ड) उपचारासाठी आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक तत्त्वे (गाइडलाइन्स) प्रसिद्ध केली आहेत. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना असणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन या गाइडलाइन्स तयार करण्यात आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून उपचारासाठी मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये लहान मुलांसाठी रेमडेसिविरचा वापर करण्याविषयी शिफारस करण्यात आली नाही.
तिसऱ्या लाटेत लहान मुलांना करोनाचा धोका वर्तवण्यात आला आहे. याविषयी अनेक मतमतांतरे आहेत; तरीही खबरदारी म्हणून केंद्र सरकारने पावले उचलण्याला सुरुवात केली असून, तशा तयारीच्या सूचनाही राज्य, जिल्हा, शहरे, ग्रामीण प्रशासन यांना देण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने करोनाबाधित लहान मुलांच्या उपचारासाठी गाइडलाइन्स तयार केल्या आहेत.
आरोग्य मंत्रालयाच्या या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये लहान मुलांसाठी रेमडेसिविर वापरू नये असेच सुचवण्यात आले आहे. 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये रेमडेसिविरच्या संदर्भात पुरेशी सुरक्षितता आणि कार्यक्षमतेच्या माहितीचा (एफिकेसी डेटा) अभाव आहे, असे त्यात म्हटले आहे. तसेच रुग्णालयात दाखल गंभीर रुग्णांसाठीच औषधांचा वापर केला जावा, असेही या गाइडलाइन्समधून स्पष्ट करण्यात आले आहे.
12 वर्षे वयापुढील मुलांची प्रकृती तपासण्यासाठी सहा मिनिटे चालण्याची शिफारस केली आहे. अनियंत्रित अस्थमा असणाऱ्यांसाठी या टेस्टची शिफारस नाही. करोनामुळे प्रकृती गंभीर असल्यास ऑक्सिजन थेरपी त्वरित सुरू केली जावी, द्रव आणि इलेक्ट्रोलाइट संतुलन राखणे आणि कॉर्टिकोस्टेरॉईड थेरपी सुरू केली जावी, असेही सांगितले आहे.
लक्षणे नसणाऱ्या किंवा सौम्य करोना केसेसमध्ये “स्टिरॉईड’ धोकादायक ठरू शकतात. यामुळे त्यांना केवळ रुग्णालयात दाखल गंभीर आजारी असणाऱ्या रुग्णांनाच डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवावे. “स्टिरॉईड’ योग्य वेळेवर, योग्य प्रमाणात आणि योग्य काळापुरती घेतली जावीत, असेही या मार्गदर्शक तत्त्वात नमूद केले आहे. “स्टिरॉईड’मुळे काळ्या बुरशीचा संसर्ग निर्माण होत आहे. तसेच पाच वर्षांखालील मुलांना मास्क लावू नका आणि सहा ते 11 वर्षांमधील मुलांना आई-वडिलांच्या मार्गदर्शनाखाली मास्क घालावेत असे यात म्हटले आहे.