पुणे – पवित्र पोर्टलमार्फत मुलाखतीसह खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षक भरतीला सामान्य प्रशासन विभागाने ग्रीन सिग्नल दिला आहे. यामुळे 900 शिक्षण संस्थांमधील 2 हजार 500 शिक्षकांची रिक्त पदे भरता येणार आहेत.
राज्य शासनकडून 12 हजार शिक्षकांची भरती करण्याची घोषणा करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील मुलाखतीशिवाय भरतीला सुरुवात करण्यात आली. याद्वारे आतापर्यंत 6 हजार नियुक्त्या देण्यात आल्या. माजी सैनिकांच्या 1 हजार 500 जागांच्या भरतीला वर्षभरासाठी स्थगिती देण्यात आली आहे.
मुदतीत कागदपत्रे सादर न केलेल्या, निवड होऊनही शाळांमध्ये विविध कारणांनी सुरू न झालेल्या सुमारे 400 जागा अद्यापही रिक्त असून यावरही निवड यादीतील उमेदवारांना प्राधान्यक्रमानुसार संधी देण्यात येणार आहे. खासगी शाळांमधील एकूण 3 हजार पदे भरण्याचे नियोजन आहे.
मात्र यातील पहिली ते पाचवीच्या वर्गांसाठीच्या 381 शिक्षकांच्या जागाबाबत ब्रिज कोर्सच्या अनुषंगाने उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या आहेत. त्यावर अद्याप निर्णय झाला नसल्याने ही भरती तूर्तास थांबवली आहे. इयत्ता सहावी ते बारावीच्या वर्गांसाठीच्या शिक्षकांच्या जागा आधी भरण्यात येणार आहेत.
भरतीसंदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे
जुलै अखेर मुलाखतीसाठीची उमेदवार निवड यादी प्रसिद्ध करणार
मुलाखतीसाठी संस्थांना तीन आठवड्यांचा कालावधी मिळणार
एका जागेसाठी दहा उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविणार
मुलाखतीसाठी 30 गुण असणार
मुलाखतीचे व्हिडीओचित्रीकरण करणे बंधनकारक
शाळा व्यवस्थापन समिती मुलाखती घेणार
करोनाचे संकट, न्यायालयीन प्रकरणे, विविध आरक्षणाचा तिढा यासह इतर अडचणीतून मार्ग काढत शिक्षण भरती पूर्ण करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. शासनाकडे अनेकदा पाठपुरावा केल्यामुळे अखेर काही प्रस्तावाला मंजूरी मिळाली आहे. आता मुलाखतीसह होणारी शिक्षक भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. यात कोणतीही वशिलेबाजी होऊ नये याची खबरदारी बाळगण्यात येणार आहे. पारदर्शकपणे व गुणवत्तेनुसारच ही भरती व्हावी यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.
– विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्त