पुणे -पुणे शहराप्रमाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तरुण-तरुणींचा स्पर्धा परीक्षेतील टक्का वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषदेने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या युवकांना अभ्यासिका खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा ग्रामीण भागातील युवक-युवतींना लाभ होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने शाहू, फुले, आंबेडकर ग्राम अभ्यासिकांच्या इमारती बांधून पूर्ण केल्या आहेत. यापैकी काही अभ्यासिका या तात्पुरत्या स्वरूपात सुरूही केल्या आहेत. मात्र, या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या युवकांना या अभ्यासिकांचा अधिकाधिक वापर व्हावा, या उद्देशाने सर्व अभ्यासिका आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या युवक-युवतींसाठी खुल्या करून दिल्या जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
मागासवर्गीय युवक व युवतींना नाममात्र दराने या अभ्यासिकांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. नियंत्रण व देखरेखीसाठी जिल्हा, तालुका पातळीवर संनियंत्रण समित्या; तर गावपातळीवर युवक कार्यकारी समित्यांची स्थापना करण्याचा आदेश प्रसाद यांनी दिला आहे. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या प्रवर्गातील युवक-युवतींना प्राधान्याने प्रवेश देण्यात येणार आहेत.
ग्रामपंचायतींकडून वर्गणी
अभ्यासिकांची देखभाल करण्यासाठी आवश्यक कर्मचारी मानधनावर ठेवण्यासाठी ग्रामपंचायतींकडून निधी जमा केला जाणार आहे. यानुसार ग्रामपंचायतींकडून वार्षिक वर्गणी घेतली जाणार आहे. यासाठी ग्रामपंचायतींची तीन गटांत विभागणी केली आहे. पाच हजारांपुढील लोकसंख्या असलेल्या, अडीच हजार ते पाच हजारांपर्यंत लोकसंख्या असलेल्या आणि अडीच हजारांच्या आत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायती असे तीन गट आहेत. या ग्रामपंचायतींकडून अनुक्रमे चार, दोन आणि एक हजार रुपयांची वर्गणी घेतली जाणार आहे.
ग्रामीण भागातील तरुणांना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी अभ्यासिका खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासिकेत उत्कृष्ट फर्निचर आणि स्पर्धा परीक्षेची सर्व पुस्तके मिळतील. जे विद्यार्थी गरीब आहेत, ज्यांना घरात पुरेशी जागा नाही आणि पुस्तके परवडण्याजोगे नाहीत, ते अभ्यासिकेत सहभागी होऊ शकतील.
-आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे