पुणे – वीजबिल भरणा केंद्रात जाऊन रांगेत उभे राहण्याऐवजी ऑनलाइन वीजबिल भरण्यास पसंती वाढलेली आहे. वीजग्राहकांचा महावितरणच्या वीजबिलांचा ऑनलाइनद्वारे भरण्यासाठी प्रतिसाद वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे.
गेल्या एप्रिल ते ऑक्टोबरपर्यंत पुणे परिमंडलातील दरमहा सरासरी 17 लाख 57 हजार ग्राहकांनी वीजबिलांपोटी 457 कोटी 18 लाख रुपयांच्या वीजबिलांचा सुरक्षित व घरबसल्या ऑनलाइन भरणा केला आहे.
महावितरणने ग्राहकांसाठी डिजिटल स्वरुपात सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे बिल भरणा केंद्रात कार्यालयीन वेळेत वीजबिल भरण्याऐवजी ऑनलाइनद्वारे घरबसल्या व 24 तास वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध झाली आहे.
गेल्या एप्रिल महिन्यापासून राज्यात पुणे परिमंडलातील वीजग्राहकांनी ऑनलाइन वीजबिल भरणा करण्यास प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. नोव्हेंबरमध्ये आतापर्यंत 16 लाख 14 हजार लघुदाब वीजग्राहकांनी 420 कोटी 17 लाख रुपयांचा ऑनलाइनद्वारे भरणा केला आहे.