भवानीनगर -मला आमदार झाल्यासारखं वाटतंय या गाण्यावर मुलांसमवेत इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी ठेका धरला. श्री छत्रपती हायस्कूल सणसर व जिल्हा प्राथमिक शाळा सणसर तसेच ग्रामपंचायत सणसर यांच्या संयुक्त विद्यमाने सणसर (ता. इंदापूर) येथील पटांगणामध्ये भव्य स्वरूपामध्ये स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यमंत्री व विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे बोलत होते.
भरणे म्हणाले की, खऱ्या अर्थाने श्री छत्रपती हायस्कूल सणसर व सणसर ग्रामपंचायत तसेच सर्व ग्रामस्थांनी इतरांना देखील दाखवून दिलेले आहे. सणसर गाव हे खऱ्या अर्थाने राजकीय वारसा जपण्याबरोबर सांस्कृतिक वारसा जपण्यात देखील महत्त्वाचे गाव आहे.
सणसर गावचे सरपंच पार्थ निंबाळकर उपसरपंच दीपक चव्हाण त्यांचे सर्व सदस्य तसेच श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक ऍड. रणजित निंबाळकर, डॉ. दीपक निंबाळकर व गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येऊन आर्थिक निधी उभारून भव्य स्वरूपामध्ये गावामध्ये स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते.
भरणे म्हणाले, आमदार असलो तरी अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन मुलांमध्ये रमण्याचा मोठा आनंद वाटतो. मी कायमच मुलांमध्ये रमत असून सर्वसामान्य जनतेत देखील सर्वांचा मामा म्हणूनच वावरत असतो. याचा मला मनापासून आनंद होत आहे. सणसरकरांनी व श्री छत्रपती हायस्कूलमधील मुख्याध्यापक सर्व शिक्षकांनी जे कष्ट घेऊन भव्य स्वरूपामध्ये स्नेहसंमेलन आयोजन केले आहे त्याचे कौतुक सर्व परिसरातील इतरही शाळा घेतील असं मला विश्वास वाटत आहे.
या कार्यक्रमास श्री छत्रपती साखर कारखान्याचे माजी संचालक विजयसिंह निंबाळकर, श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, संचालक ऍड. रणजीत निंबाळकर, डॉ. दीपक निंबाळकर, बाळासाहेब पाटील, सरपंच पार्थ निंबाळकर, उपसरपंच दीपक चव्हाण सर्व ग्रामपंचायत सदस्य, सणसर सोसायटीचे अध्यक्ष परशुराम रायते, हेमंत निंबाळकर, विजय पाटील, वसंत जगताप, श्री छत्रपती हायस्कूल सणसरचे मुख्याध्यापक सुनील सर्जे, प्राचार्य रमेश मचाले, मुख्याध्यापक लक्ष्मण गिरी गोसावी, व ग्रामस्थ महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.