सातारा – खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी फलटण येथील दोघांना न्यायालयाने सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. आकाश उर्फ लैलीपप्या जाधव (वय 25 रा. मोती चौक, फलटण) आणि विकास जाधव (वय 24, रा. मलटण ता. फलटण) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.
या खटल्याची हकीकत अशी, दि. 2 सप्टेंबर 2017 रोजी ही घटना घडली होती. त्या दिवशी दुपारी तेजस उर्फ सोन्या बाळू देशपांडे याचे व आकाश उर्फ लैलीपप्या शिवाजी जाधव, विकास दशरथ जाधव यांना त्यांच्या गाडीतील पेट्रोल मागितल्यावरून शिवीगाळ झाल्याचा राग मनात होता. त्यांनी रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास तेजस याला फलटणमधील मंगळवार पेठेतील आखरी रस्ता येथून गणपती पाहण्यासाठी चल, असे म्हणून गाडीवर बसवले. त्यानंतर काळुबाई नगर रोड, मलटण येथे घेऊन जाऊन तेथे अनिता अविनाश जाधव (वय 26, रा. मलटण, ता. फलटण) आणि संतोष दत्तू सस्ते (वय 45, रा. मलटण, ता. फलटण) यांना बोलावून घेतले. यानंतर या चौघांनीही मिळून तेजस यास शिवीगाळ करीत धमकी देऊन हाताने, पायाने मारहाण करून तसेच चाकूने वार केले. याबाबतची फिर्याद फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.
या गुन्ह्याचा तपास फलटण शहर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एस. सी. मुंडे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. हा खटला दुसरे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस. आर. सालकुटे यांच्या कोर्टात चालला होता. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील म्हणून फिरोज शेख यांनी कामकाज पाहिले. या खटल्यात एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले.
केवळ परिस्थितीजन्य पुरावा, अन्य साक्षीदारांच्या साक्षी तसेच सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीशांनी आरोपी आकाश उर्फ लैलीपप्या जाधव आणि विकास जाधव या दोघांना सात वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी पाच हजार रुपये दंड, दंड न दिल्यास एक वर्ष साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे. अनिता जाधव आणि संतोष सस्ते यांना या खटल्यातून निर्दोष मुक्त केले आहे. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलीस अंमलदार संजय पाटील यांनी कामकाज पाहिले. त्यांना पोलीस प्रॉसिक्युशन स्कॉडचे पोलीस निरीक्षक नितीन सावंत, पोलीस हवालदार शमशुद्दीन शेख, पोलीस हवालदार गजानन फरांदे, मंजूर मणेर, महिला पोलीस हवालदार रहिनाबी शेख, राजेंद्र कुंभार, महिला पोलीस कॉन्स्टेबल अश्विनी घोरपडे, पोलीस कॉन्स्टेबल अमित भरते यांनी मदत केली.