पौड : मुळशी तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत थेट सरपंच निवडणुकीत तरुणाईची “क्रेझ’ पाहायला मिळाली असून, मतदारांनी तरुणांच्या विशेषतः महिलांच्या हाती सत्तेच्या चाव्या दिल्या आहेत. मतमोजणीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसने सर्वाधिक ग्रामपंचायतीवर बाजी मारली असल्याचा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष महादेव कोंढरे यांनी केला आहे.
मुळशी तालुक्यात एकूण 11 ग्रामपंचायतीच्या निवडणूक जाहीर करण्यात आली होती. यापैकी कोंढुर, वांजळे, लव्हार्ड, तव, असदे या बिनविरोध निवड झाल्या असून, उर्वरित सहा ग्रामपंचायतींसाठी रविवार ( 18 डिसेंबर) रोजी मुळशी तालुक्यात सहा ग्रामपंचायतसाठी मतदान झाले. पौड येथील सेनापती बापट सभागृहात मतमोजणी करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राजकुमार डोंगरे, सुनील जाधव, दत्तात्रय भालेराव, एम. कुरेशी, झंजे, हरिभाऊ कुलकर्णी यांनी काम पाहिले.
यावेळी तहसीलदार अभय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही मतमोजणी पार पडली. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव, गटविकास अधिकारी संदीप जठार, नायब तहसीलदार श्रीकांत मिसाळ हेही उपस्थित होते. सहायक पोलीस निरीक्षक रमेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मतमोजणी परिसरात उमेदवार,प्रतिनिधी तसेच समर्थक यांनी मोठी गर्दी केली होती.
विजयी सरपंच
स्वाती नितीन मोरे (दासवे), पल्लवी हेमंत पासलकर (आडमाळ), रसवंता काळुराम पासलकर (मोसे), सरपंच पद रिक्त(पाथरशेत) , नंदा नामदेव चौधरी (माळेगाव), राजेंद्र रामभाऊ मारणे (भोडे)