लोणी काळभोर – राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवार (दि. 7) ते सोमवार (दि. 9) या कालावधीत विशेष मोहीम राबवून अवैध मद्य विक्री व अवैध मद्य सेवन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली आहे. 21 गुन्ह्यांमध्ये 25 आरोपींना न्यायालयाने 37 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर जास्त किमतीला मद्यविक्री केल्याबद्दल वाईन शॉपी व देशी दारू बार यांच्यावर 10 विभागीय गुन्हे दाखल केले आहेत.
राज्याचे उत्पादन शुल्क आयुक्त विजय सुर्यवंशी, अंमलबजावणी व दक्षता संचालक सुनील चव्हाण, राज्य उत्पादन शुल्कचे विभागीय उपायुक्त ए. बी. चासकर यांच्या आदेशानुसार व अधीक्षक सी. बी. राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यामध्ये विशेष मोहिम राबविण्यात आली होती. या मोहिमेत अवैध मद्य विक्री व मद्य सेवन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली. अटक आरोपींना न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर एकूण 25 आरोपींना न्यायालयाने एकूण 37 हजार रुपये दंड ठोठविण्यात
आलेला आहे.
या पूर्वी सुद्धा सप्टेंबर ते डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये कलम 68 व 84 नुसार कारवाई करण्यात येवून एकूण 35 गुन्हे नोंदवून त्यामधील एकूण 71 आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवून 1 लाख 27 हजार 800 रुपये दंड ठोठावला होता. तसेच चालु वर्षामध्ये एकूण 382 सराईत आरोपींकडून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्याकरिता सक्षम प्राधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर केलेले आहे. तसेच एमपीडीए अंतर्गत कारवाईसाठी एकूण 17 प्रस्ताव व मोक्काअंतर्गत 2 प्रस्ताव संबंधित सक्षम प्राधिकारी यांना सादर केलेले आहेत.