– विजय शिंदे
वडापुरी – इंदापूर तालुक्यात 26 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अनेक नेत्यांच्या गावातही निवडणुका होत आहेत. गावागावांतून रस्ते, चौक गजबजलेले असून प्रचाराने वेग घेतला असून “एकदा मला संधी द्या अन् बघा गावाचा विकास कसा करतो ते… अशी गळ मतदारांना घालण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून केला जात आहे.
पडस्थळ, मदनवाडी, माळवाडी, रणमोडवाडी, डाळज नं. 2, बिजवडी, लाखेवाडी, थोरातवाडी, जांब, बोरी, न्हावी, हिंगणवाडी, झगडेवाडी, कळाशी, कुरवली, म्हसोबावाडी, मानकरवाडी, रेडणी, डाळज नं.1, डाळज नं.3, बेलवाडी, डिकसळ, अजोती, सराटी, पिंपरी खुर्द, गंगावळण या 26 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे.
चिन्ह वाटपानंतर ऐन थंडीच्या दिवसात इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात प्रचाराला सुरवात झाली असून “पॅनल टू पॅनल’ मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. काही ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी मोठ्या गावात चौरंगी सामना होत असल्याने उत्सुकता वाढली आहे. पॅनल जास्त असलेल्या ठिकाणी मतदारांना कोण उमेदवार कोणत्या पॅनलमधून उभा आहे? याची खात्री करुन घ्यावी लागत आहे.
आम्हीच कसा गावाचा थांबलेला विकास करु शकतो पटवून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. काही गावांत जुन्यासह नवीन चेहरे रिंगणात उतरले आहेत. तरुणांचा अनेक गावांत उत्साह असल्याचे चित्र आहे.
सध्या गावासाठी पिण्याचे पाणी, रस्ते, वीज आदी विषय निवडणुकीत ऐरणीवर आले असून गावविकासाच्या गप्पांना वेग आला आहे. ग्रामीण भागात सध्या विविध शेतीकामे सुरू असून त्यासाठी सकाळी व रात्री कार्यकर्ते गल्लीबोळातून, घरोघरी फिरुन निवडणूकीनंतर आम्ही काय करणार आहोत? याचा पाढा वाचत आहेत. मतदार मात्र चाणाक्षपणे मतदान तुम्हालाच…असे सांगून उमेदचारांचा उत्साह वाढवत आहेत.गावातील मुख्य रस्ते, चौक, चावड्या गजबजत असून हॉटेलवर चहापाणी मागवले जात आहे.
प्रशासकीय पातळीवर मतदानाची तयारी सुरू असून प्रशासन उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे व तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक पार्श्वभूमीवर तहसील प्रशासन सज्ज असल्याचे सांगण्यात आले आहे, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस यंत्रणा ही सज्ज आहे.
मतदारांसमोर सर्वच उमेदवार आपल्या जवळचेच असल्याने कोणाची निवड करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर नेतेमंडळींची तालुका व जिल्हास्तरावर राजकीय खलबते सुरू असून, समिकरणे मांडली जात आहेत; परंतु, मतदानाच्या दिवसापर्यंत निवडणुकीचे महत्त्वाचे सुत्र मतदारांच्या हातातच राहणार आहे.
या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
या निवडणुकीत तालुकास्तरावरील अनेक दिग्गज नेत्यांच्या गावात निवडणुका होत असल्यामुळे खरी प्रतिष्ठापणाला लागणार आहे. भाजपाचे तालुकाध्यक्ष शरद जामदार बेलवाडी, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीमंत ढोले लाखेवाडी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती पांडुरंग मारकड पडस्थळ, रयत क्रांतीचे निलेश देवकर यांच्या सौभाग्यवती या सरपंच पदासाठी निवडणूक आखाड्यात उतरल्या आहेत.
यांचे समर्थक आजमावणार नशीब
सराटी ग्रामपंचायत निवडणुकीत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, मदनवाडी ग्रामपंचायत निवडणूक पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य हनुमंत (नाना) बंडगर, हिंगणगाव ग्रामपंचायत निवडणुकीत माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तांबिले,
गंगावळण ग्रामपंचायत साठी राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष महारुद्र पाटील यांचे समर्थक नशीब आजमावणार आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष अतुल झगडे हे झगडेवाडी गावातून सरपंच पदासाठी आपले नशीब आजमावणार आहेत, काहीजण स्वतः रिंगणात नसले तरी रिमोटकंट्रोल हातात ठेवण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे चित्र आहे.