वाघोली -वाघोली (ता. हवेली) येथे गट नंबर 1458 ते 1465 भूखंड क्र. 1 ते 8 यातील बांधकाम परवानगीच्या वेळी घेण्यात आलेल्या अटी शर्तीचे तंतोतंत पालन करण्याचे आदेश पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल यांनी दिले आहेत. याबाबतीत नागरिकांनी पीएमआरडीए आयुक्तांकडे लेखी तक्रारी केल्या होत्या. त्याची सुनावणी घेऊन हा निर्णय दिल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाघोली येथे मोठ्या प्रमाणात बांधकाम व्यावसायिकांनी मोठ-मोठे गृहप्रकल्प राबवले आहेत. या गृहप्रकल्पासाठी जिल्हाधिकारी व पीएमआरडीए आयुक्त यांच्या विविध परवानग्या देखील घेण्यात आल्या आहेत; मात्र या परवानगी मध्ये अटी व शर्तीचे पालन न करता आजूबाजूच्या शेतकऱ्यांना, नागरिकांना रस्त्याने ये-जा करताना किंवा रस्ता वापरासाठी खुला न करता मोठ्या प्रमाणात त्रास दिल्याच्या घटना घडू लागल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर मंजूर रेखांकनातील रस्ते हे कोणत्याही नागरिकांना अडसर ठरणार नाहीत व नागरिक व जमीन धारकांना खुले ठेवण्याबाबत पीएमआरडीएच्या आयुक्तांनी आदेश दिल्याने रस्त्यांचा वापर व रस्त्यांवरून लगतच्या गटातील जमीन धारकांना ये-जा करण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
विकास परवानगी प्रारंभ प्रमाणपत्र घेताना ज्या अटी व शर्ती निश्चित केलेल्या आहेत. त्या अटी व शर्तींचे उल्लंघन झाले तर त्याची दखल संबंधित प्राधिकरणाकडून घेतली जात असून अटी व शर्तींचे तंतोतंत पालन करण्याचे आदेश संबंधित विभागाकडून देण्यात येत असल्याचे उदाहरण वाघोलीमध्ये घडले असल्याने याचा फायदा सामान्य नागरिक, शेतकरी,
लगतच्या जमीन गटातील मालकांना देखील होणार आहे. याशिवाय पुणे महानगरपालिकेच्या वतीने कचरा संकलन करणारी वाहने, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करणारे टॅंकर, अत्यावश्यक सेवेतील म्बुलन्स, फायर ब्रिगेड ची वाहने, आदींना सेवा पुरवण्याचा मार्गदेखील मोकळा झाल्याची भावना शेतकरी, नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.