पुणे -सन 2017 पासून प्रलंबित अनुदान मिळावे, मशिनने ऊस तोडणी दर 700 रुपये करावा आणि ऊस तोडणी मशिन मालकांसाठी लवाद स्थापन करावा, या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी मशिन मालक संघटनेतर्फे साखर संकुल येथे तीन दिवसीय ठिय्या आंदोलन सुुरू झाले आहे. शासनाने थकित अनुदान दिले नाही तर सर्व मशिन मालक प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मशिन लावून कार्य करतील. तसेच अतिरिक्त ऊस व तोडणी राहिली तर त्यास शासन जबाबदार असेल, असा इशारा संघटनेने दिला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री, विरोधी पक्षनेते आणि सहकार आयुक्त शेखर गायकवाड यांना याबाबतचे निवेदन संघटनेचे अध्यक्ष सचिव अमोलराजे जाधव यांनी दिले आहे. संघटनेचे अध्यक्ष संजय साळुंके, उपाध्यक्ष प्रभाकर भिमेकर, गणेश यादव व युवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन सुरू आहे. यात लातूर, बीड, कोल्हापूर, सातारा, नांदेड, सोलापूरसहित संपूर्ण महाराष्ट्रातून ऊस तोडणी मशिन मालक सहभागी झाले. यावेळी अनुदान आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’ अशा घोषणा देण्यात आल्या.
केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्यातून सुरू झालेल्या विविध योजनेचा भाग म्हणून 2011 व 2012 पासून ऊस तोडणी मशिनद्वारे ऊस तोडणी सुरू केली. याला सुरू केलेले अनुदान 2017 पर्यंत होते. संबंधित वर्षाच्या 868 मशिन अनुदानासाठी प्रलंबित आहेत. परंतू शासनाने या विषयाला गंभीरतेने घेतले नाही. त्यामुळे आमच्यावर अन्याय झाला आहे. यासाठी शासन स्तरावर वेळोवेळी आवाज उठविला गेला; परंतु त्याची दखल घेतली गेली नाही. त्या पार्श्वभूमीवर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.