लोणी काळभोर -व्यसन ही फक्त सवय नाही तर हा मेंदूचा एक आजार आहे. कोविडच्या साथीनंतर व्यसनांमध्ये मोठी वाढ झाली असून यामध्ये ड्रग्ज (अंमली पदार्थ) आणि वर्तणुकीशी संबंधित व्यसने या दोन्हींचा समावेश आहे. परंतु या जुनाट आजाराचे व्यवस्थापन करण्यासाठी सामान्य जनता, प्राथमिक काळजी घेणारे डॉक्टर किंवा मानसिक आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी यापैकी कोणीही जागरूक नाहीत किंवा प्रशिक्षित नाहीत. या अभावामुळे व्यसनाधीनतेसंबंधी विकार असलेल्या 100 पैकी 75 लोकांना आवश्यक असलेले उपचार उपलब्ध नाहीत.
व्यसनाधीन व्यक्तींना योग्य वेळी आणि ठिकाणी आवश्यक ते उपचार मिळावे यासाठी व्यसनमुक्ती आणि त्यावरील उपचार याविषयी मुक्ता चॅरिटेबल फाउंडेशन, रोटरी क्लब आणि इतर संस्था मार्गदर्शन सत्र आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम दर वर्षी आयोजित करतात. यंदा परिषदेचे 25वे वर्ष आहे.
व्यसनमुक्तीविषयी जागृती करण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब व मुक्ता चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवम हॉस्पिटलमध्ये व्यसनाधीनता आणि औषधोपचारावरील परिषदेचे आयोजन केले आहे. रोटरी फाऊंडेशनच्या ग्लोबल ग्रॅंट बेल्जियम जिल्हा आयोजित आणि रोटरी क्लब पुणे हवेली, रोटरी क्लब ऑफ डिक्शन प्रिव्हेन्शन, मुक्ता चॅरिटेबल फाउंडेशन, पुणे यांनी या परिषदेचे आयोजन केले आहे.
तीन आठवड्यांच्या या दीर्घकालीन परिषदेमध्ये मार्गदर्शन आणि इच्छुकांसाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन केले आहे. व्यसनाधीनता व औषधोपचार विषयावरील अभ्यासक्रम ऑनलाइन व ऑफलाइन स्वरूपात सुरु आहे. पहिल्या दिवशी डॉ. मधु ठक्कर आणि डॉ. प्रकाश महाजन यांनी मार्गदर्शन केले.
या परिषदेमधे डॉक्टर, परिचारिका, मानसोपचार तज्ञ, समुपदेशक, व्यसनमुक्तीसाठी काम करणारे इच्छुक, समाजसेवक, वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी सहभागी झाले असून डॉ अविनाश डिसूझा, डॉ अमर शिंदे, डॉ हिमांशू पेंडसे, डॉ स्वप्नील देशमुख, सोनाली काळे, दीपिका पाटील मार्गदर्शन करणार आहेत.