राजगुरूनगर -अवघड क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षकांची रिक्त पदे भरताना सेवाज्येष्ठ शिक्षक व पदवीधर शिक्षकांवर अन्याय करू नये, अशी मागणी महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभेच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाने प्राथमिक जिल्हा परिषदेच्या शाळेतील प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापक या संवर्गासाठी दि. 7 एप्रिल 2021 च्या शासन निर्णयानुसार सुधारित ऑनलाइन बदली प्रक्रिया राबवली आहे. यामध्ये मानवी हस्तक्षेप टाळून पारदर्शकता आणणे हा शासनाचा हेतू होता.
त्यानुसार या बदल्यांचे पहिले पाच टप्पे पूर्ण झाले असून काही अपवाद वगळता ऑनलाइन बदल्याबाबत शिक्षकांमध्ये समाधान आहे. सध्या अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठी सहावा टप्पा राबवला जात आहे. नवीन सुधारित धोरणानुसार ही पहिल्यांदा बदली प्रक्रिया राबवली जात आहे. , असे सभेच्यावतीने सांगण्यात आले.
पुणे जिल्हाध्यक्ष शांताराम नेहेरे म्हणाले की, बदलीच्या सहाव्या राऊंड मधील वय वर्षे 53 पेक्षा जास्त असलेल्या शिक्षकांवरील अन्याय दूर करावा. बदल्या 30 एप्रिल 2023 नंतर होणार असल्याने अवघड क्षेत्रात रिक्त असलेली सर्व पदे नवीन शिक्षण सेवक भरतीद्वारे भरण्यात यावीत. पदोन्नतीनंतर पदवीधर वेतनश्रेणी किंवा कोणताही अतिरिक्त लाभ मिळत नसल्याने विज्ञान पदवीधर शिक्षकांच्या 6 व्या राऊंड मधील बदल्या रद्द करण्यात याव्यात, असे आवाहन करण्यात आले.