लोणी काळभोर -पूर्व हवेली डॉक्टर्स असोसिएशनने पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील वैद्यकीय व्यावसायिकांच्या रूरल डॉक्टर्स प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. 16 जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. या संदर्भात सविस्तर माहिती रुरल डॉक्टर्स प्रिमीयर लिगचे अध्यक्ष डॉ. राहुल काळभोर व पूर्व हवेली डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षा वनिता काळभोर यांनी दिली.
ते म्हणाले, लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी विद्यापीठाच्या शेजारच्या डिझायर क्रीडांगणावर या स्पर्धा होणार आहेत. एकूण 32 संघांनी या स्पर्धेत भाग घेतला असून, ग्रामीण भागातील साधारण 500 वैद्यकीय व्यावसायिक या ठिकाणी उपस्थित रहाणार आहेत.
गेल्या सात वर्षांपासून पूर्व हवेली डॉक्टर्स असोसिएशन स्पर्धा आयोजित करत आहे. स्पर्धेचे थेट प्रक्षेपण असोसिएशनच्या यू ट्यूब चॅनेलवर करण्यात येणार आहे. 27 जानेवारी रोजी अंतिम फेरी होणार आहे. नागरिकांनी स्पर्धा पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन असोसिएशनने केले आहे.