मंचर – मंचर उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग तपासणी शिबिर पार पडले. या शिबिरामध्ये खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यांतील सुमारे 2500 दिव्यांग व्यक्तींनी सहभाग नोंदवला. दिव्यांग कल्याण आयुक्त पुणे आणि जिल्हा परिषद पुणे यांच्या वतीने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये मतिमंद, अस्थिव्यंग, अंध या व्यक्तींचा मोठा सहभाग होता. या शिबिरामध्ये आलेल्या सर्व दिव्यांगांचे तपासणी करून प्रमाणपत्र देणे शक्य नसल्याकारणाने शिबिरामध्ये 100 अस्थिव्यंग, 170 मतिमंद, 200 अंध,
तसेच दिव्यांग पुनर्वसन केंद्र औंध यांच्या वतीने जयपूर फुट, जयपुर हात यासाठी 7 दिव्यांग व्यक्तींची तपासणी करण्यात आली. उर्वरित दिव्यांग व्यक्तींना तपासणीसाठी आठवड्याभराच्या फरकाने तारखा देण्यात आल्या. या शिबिरासाठी औंध हॉस्पिटल पुणे, उपजिल्हा रुग्णालय मंचर व ग्रामीण रुग्णालय घोडेगाव येथील डॉक्टरांनी कामकाज पाहिले, अशी माहिती डॉ. कैलास भागवत, डॉ. सचिन कांबळे, डॉ. सीमा डेरे यांनी दिली.
या शिबिरामध्ये समर्थ दिव्यांग सेवा संघटनेने सुनील दरेकर, समीर टाव्हरे, ज्ञानेश्वर शिंदे, पूनम काळे, अविनाश लबडे यांनी विशेष सहकार्य केले. डोळे तपासणीसाठी अपुरी साहित्य यंत्रणा असल्याने (उदा. डोळ्याच्या पडद्याची तपासणी यंत्र उपलब्ध नसल्याने) बऱ्याच अंध रुग्णांना पुढील तारीख देण्यात आली.
तीन दिवसाच्या शिबिराची मागणी
समर्थ दिव्यांग सेवा संस्था संघटनेच्या वतीने दिव्यांग तपासणी शिबिर एक दिवसाच्या ठेवण्याऐवजी तीन दिवसाचे ठेवण्यात यावे. डॉक्टरांची आणि तपासणी साहित्याची पुरेशी संख्या उपलब्ध असावी. प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या दिव्यांग व्यक्तींची तपासणी करण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या.