कराड – करोना संकटाच्या काळात निवडणुकीचा मुद्दा महत्वाचा करणे, प्रचाराची भूमिका घेणे नैतिकदृष्ट्या योग्य नाही. या कारणामुळे मी पुणे पदवीधर निवडणूक लढवणार नाही. नोंदणी प्रक्रियेत सहकार्य केलेल्या बहुतांश कार्यकर्त्यांशी चर्चा करून पक्षाचे नेते शरद पवार यांना माझा निर्णय दि. 10 जुलै रोजी कळवला आहे.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना तशी कल्पना दिली असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माहिती तंत्रज्ञान सेलचे प्रमुख सारंग पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुणे पदवीधर निवडणुकीसंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित व्हिडिओ कॉन्स्फरनिंसगव्दारे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सारंग पाटील म्हणाले, “पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीला 2014 मध्ये मी राष्ट्रवादी व मित्र पक्षाचा उमेदवार होतो. या निवडणुकीत अगदी थोडक्या मतांनी पराभव झाल्यानंतर खचून न जाता यावर्षी होणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाण्याच्या निर्णयाने मी तयारीला लागलो होतो.
दरम्यानच्या काळात माहिती तंत्रज्ञान सेलचा प्रमुख म्हणून पक्षाच्या बूथ कमिटी प्रकल्पासाठी नवीन तांत्रिक प्रणाली विकसित करता आली. पक्षकार्यात सक्रिय राहून पदवीधर मतदारसंघातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूर या पाचही जिल्ह्यांत संपर्क कायम ठेवता आला. ” ऑक्टोबरमध्ये अनपेक्षित घडामोडींमध्ये सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत शरद पवार यांच्या आदेशाप्रमाणे माझे वडील खासदार श्रीनिवास पाटील यांनी पोटनिवडणूक लढवी.
लोकांनी त्यांना ऐतिहासिक विजय मिळवून दिला. याची जबाबदारी आणि जाणीव त्यांचा कुटुंबीय म्हणून मला आहे. सध्याच्या करोनाच्या परिस्थितीमुळे मोठे संकट उभे राहिले आहे. लोकसंपर्काचे सार्वजनिक समारंभ, सभा घेणे अवघड आहे. पुणे पदवीधर निवडणूक जाहीर होण्याची तारीख निघून गेली आहे.
यापुढे ही निवडणूक कधी लागेल, हे निश्चित सांगता येत नाही. करोना काळात निवडणुकीचा मुद्दा महत्वाचा नाही. म्हणून निवडणूक लढविणार नाही, असा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे कार्यकर्ते, मतदार व माध्यमांमध्ये कोणताही संभ्रम राहू नये, म्हणून ही भूमिका स्पष्ट करत असल्याचे सारंग पाटील यांनी सांगितले.