नवी दिल्ली: दिल्लीतील गरजू व बेरोजगारांना नोकरी देण्यासाठी दिल्ली सरकारनेही स्वतंत्र वेबपोर्टल सुरू केले आहे. या वेबपोर्टलला उद्योगपती आणि व्यापाऱ्यांनीही सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केले आहे.
हे वेबपोर्टल रोजगार बाजार नावाने कार्यरत राहील. करोनाच्या लॉकडाऊनच्या काळात ज्यांना आपले रोजगार गमवावे लागले आहेत त्यांनी रोजगार पुरवणे हा याचा मुख्य उद्देश आहे असे केजरीवाल यांनी यावेळी नमूद केले.
ते म्हणाले की अनेकांना काम हवे आहे आणि उद्योग व्यावसायिकांना चांगली माणसे कामाला मिळू शकत नाहीत. त्यांच्यात समन्वय साधण्याचे काम हे पोर्टल करणार आहे. दिल्लीत रस्त्यावरील फेरीवाल्यांनाही त्यांचे व्यवसाय सुरू करण्यास अनुमती दिली जात आहे अशी माहितीही त्यांनी यानिमित्ताने बोलताना दिली. कामगार मंत्री गोपाल राय म्हणाले की सरकारचे हे वेबपोर्टल मोफत असून त्यात अर्जदाराला किंवा मालकांना कोणतीही फी आकारली जाणार नाही.