स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थांना दिलासा
पुणे – करोनामुळे राज्यातील शासकीय नोकरभरती प्रक्रिया स्थगीत केली होती. परंतु, आता राज्य शासनाने नोकरभरतीची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. शासनाच्या वित्त विभागाने मंगळवारी अधिसुचना काढून सुधारित आकृतिबंध मंजूर करून घेतलेल्या विभागांना लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील 100 टक्के आणि आयोगाच्या कक्षेबाहेरील 50 टक्के रिक्त पदे भरण्यास मान्यता दिली आहे.
दीर्घकालीन वित्तीय स्थैर्यासाठी राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या वेतनावरील वाढता खर्च लक्षात घेता 2015 मध्ये शासनाने नोकरभरतीवर निर्बंध घातले होते. त्यानंतर 2017 मध्ये एक आदेश काढून सर्व प्रशासकीय विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयातील मंजूर पदांचा आढावा घेऊन सुधारित आकृतीबंध अंतिम करण्याच्या सूचणाही दिल्या होत्या.
राज्य शासनाच्या आदेशानुसार विविध विभागांनी सुधारित आकृतीबंध तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली असतानाच मार्च 2020 मध्ये करोनाचे संकट ओढावले.
करोनामुळे शासनाने सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषध विभाग वगळून इतर सर्व विभागांतील नोकरभरतीवर निर्बंध लागू केले होते. आता तब्बल दोन वर्षांनंतर हे निर्बंध मागे घेतले आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थांना दिलासा मिळेल.