प्रश्न न सुटल्यास महापालिका भवनासमोर आंदोलनाचा इशारा
पुणे – महापालिकेच्या शाळांमधील शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या पुणे शहर शाखेने दिला आहे. हे प्रश्न न सोडविल्यास महापालिका भवनसमोर आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक संघाच्यावतीने देण्यात आला आहे.
शिक्षक संघाच्यावतीने महापालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून, त्यामध्ये प्रलंबित मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने इंग्रजी माध्यमाच्या रिक्त पदांवर संच मान्यतेनुसार 2012 पासून प्रलंबित असलेली शिक्षक भरती तसेच मुख्याध्यापकांच्या सुमारे 100 रिक्त पदांवर शिक्षकांना पदोन्नती द्यावी. मराठी आणि उर्दू माध्यमांच्या शाळेतील मुख्याध्यापकांच्या रिक्तपदांवर 2016 पासून प्रलंबित असलेला पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावावा. सर्व माध्यमांतील शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी विना अट मंजूर करावी. मराठी माध्यम विज्ञान विषय पदवीधर आणि इंग्रजी माध्यम पदवीधर रिक्त पदांवर संच मान्यतेनुसार पदोन्नती द्यावी.
1977 च्या ठरावानुसार प्राथमिक शिक्षकांना केंद्र सरकारप्रमाणे महागाई भत्ता लागू करण्यात यावा. कोविड काळात शिक्षकांचा कपात केलेला पगाराचा फरक जमा करावा. 1 जानेवारी 2016 नंतर सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना 7 व्या वेतन आयोगानुसार पेन्शन सुरू करावी. कोविड ड्युटी उन्हाळी सुट्टीत काम केलेला कालावधी अर्जित रजेत परावर्तीत करावा, या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. शिक्षक संघाचे अध्यक्ष रवींद्र सातकर, सरचिटणीस महेंद्र दळवी आणि शिक्षक नेते सचिन डिंबळे यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.