पुणे – ‘वन नेशन वन नंबर’ अंतर्गत भारत क्रमांकाच्या सीरीजला (बीएच) पुण्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. मागील वर्षभरात पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडे (आरटीओ) या सीरीजच्या नोंदीमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वाहनांची नोंदणी हस्तांतरित (व्हेकल रजिस्ट्रेशन ट्रान्सफर) करण्याचे टाळण्यासाठी २०२१ मध्ये रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्रालयाने बीएच सीरीज सुरू केली होती.
एखादे वाहन दुसऱ्या राज्यात फक्त १२ महिने चालवू शकतात. त्यानंतर जर वाहन त्याच राज्यात चालवायचे झाल्यास त्या राज्यात ते वाहन नोंदणी करणे आवश्यक असते. मोटर वाहन अधिनियम, १९८८, कलम ४७ अंतर्गत वाहनांची नोंदणी करणे बंधनकारक असते. परंतु, वाहन मालकाकडे बीएच नंबर सीरीज असेल तर त्याला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी कोणत्याही परवानगी घ्यायची गरज लागत नाही. तो या सीरीजवर देशातील कोणत्याही राज्यात किंवा राज्यातील कोणत्याही कानाकोपऱ्यात प्रवास करू शकतो. त्यामुळे बीएच सिरीजला प्रतिसाद वाढत आहे.
दरम्यान रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने सध्या तरी बीएच सिरीजची सुविधा संरक्षण व विभागाचे कर्मचारी, केंद्र व राज्य सरकारच्या कर्मचारी यांना दिली आहे. तसेच पब्लिक व्हेईकल आणि खासगी क्षेत्रातील वाहन कंपनीसाठी ही सुविधा प्रस्तावित आहे. राज्य सरकार, केंद्र सरकार, संरक्षण, खासगी संस्थांसंबंधी जोडलेले कर्मचारी आणि ज्यांचे कार्यालय चारपेक्षा जास्त राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात आहेत. त्यांना बीएच सिरीजच्या सुविधेचा लाभ घेता येऊ शकतो.
तीन हजारपेक्षा जास्त वाहनांची नोंद
गतवर्षी २०२२ मध्ये बीएच सीरीजच्या १ हजार ४७ दुचाकी तर २ हजार २०२ चारचाकी वाहनांची नोंद झाली. तर यावर्षी २०२३ मध्ये या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. २ हजार ७११ दुचाकी तर ४ हजार ८४० चारचाकी वाहनांच्या नोंदी झाल्या आहेत, अशी माहिती आरटीओ प्रशासनाकडून देण्यात आली.