वानवडी – सेंट पँट्रिक चर्च ते बी.टी.कवडे रोड पर्यंतच्या कॅन्टोन्मेंट हद्दीतील कालव्यालगत असलेल्या रस्त्यावरील कचरा केवळ प्रशासकीय हद्दीच्या वादातून उचलला जात नसल्याने कचर्याचे ढिग साचले आहेत. संबंधित प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरीकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
कालव्या शेजारी बी.टी. कवडे रस्ता ते सेंट पॅट्रिक चर्च पर्यंत येण्या-जाण्यासाठी फक्त दुचाकी वाहनांकरीता रस्ता आहे. या रस्त्याचा बी.टी कवडे रोडकडील अर्धा भाग हा महापालिका आणि सेंट पॅट्रिक चर्चच्या बाजूचा अर्धा भाग हा कॅन्टोन्मेंट हद्दीत येतो. कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून त्यांच्या हद्दीतील कचरा वेळच्या वेळी उचलला जात नसून सफाई होत नसल्याचे नागरीक सांगतात. येथील रस्त्याकडेला व्यावसायिक हे फळे, खाद्य पदार्थ विकण्यासाठी बसतात. कचर्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. संबंधित प्रशासनाने याची दखल घेऊन या ठिकाणी स्वच्छता करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
उघड्यावर कचरा टाकू नका
कालव्यालगत रस्त्यावरुन दिवसभरात मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहकांची ये-जा होत असते. येथील व्यावसायिक तसेच ये-जा करतानाच नागरीक कालवा रस्त्याकडेला किंवा कालव्याच्या पाण्यात कचरा भिरकावतात. कचर्याविषयी वारंवार जनजागृती होत असून नागरिकांनी कचरा कोठेही न टाकता तो कचरा पेटीत टाकण्याचे आवाहन दोन्ही प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात आले आहे.