पुणे – ग्राहकांकडील वीजमीटरच्या फोटो रीडिंगसाठी महावितरणकडून सातत्याने उपाययोजना करण्यात येत असल्याने बिलिंगमध्ये अचूकता वाढली आहे. गेल्या वर्षभरात पुणे परीमंडलातील अचूक बिलिंगचे प्रमाण १.५४ टक्क्यांनी वाढले आहे. तर मीटर रीडिंगच्या अस्पष्ट फोटोचे प्रमाण १.४७ टक्क्यांवर आले आहे. मात्र १०० टक्के अचूक बिलिंगचे लक्ष्य समोर ठेऊन प्रामुख्याने ग्रामीण भागात आणखी सुधारणा कराव्यात, असे निर्देश पुणे परीमंडलाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी दिले.
रास्तापेठ येथील ‘प्रकाशदूत’ सभागृहात विभागनिहाय बिलिंग व फोटो मीटर रीडिंगबाबत नुकतीच आढावा बैठक झाली. यावेळी अधीक्षक अभियंता अरविंद बुलबुले, युवराज जरग, संजीव राठोड, सहायक महाव्यवस्थापक (वित्त) माधुरी राऊत यांच्यासह सर्व ७३ मीटर रीडिंग एजन्सीजचे संचालक, व्यवस्थापक तसेच सर्व विभागांचे कार्यकारी अभियंता, वित्त व लेखा अधिकारी उपस्थित होते.
वीजमीटर रीडिंगचे अस्पष्ट फोटोंचे पूर्वीचे १३.५ टक्के प्रमाण आता केवळ १.४७ टक्क्यांवर आले आहे. त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारींमध्ये मोठी घट झाली आहे. यंदाच्या एप्रिल ते सप्टेंबरमध्ये मागील वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत ७७५ दशलक्ष युनिटने वीजविक्री वाढली आहे, अशी माहिती मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी दिली.
एजन्सींच्या प्रतिनिधींना इशारा
गेल्या एक दोन महिन्यांत सणासुदीचे दिवस असतानाही अचूक बिलिंगचे प्रमाण कायम राहिले व त्यात वाढ झाली, ही समाधानाची बाब आहे. परंतु लक्ष्य १०० टक्के अचूक बिलिंग आहे. त्यासाठी प्रामुख्याने ग्रामीण भागात स्थानिक उपाययोजनांना गती दिली पाहिजे. महावितरणच्या बिलिंगची प्रक्रिया पूर्णपणे सेंट्रलाईज व ऑनलाइन आहे.
एजन्सीजकडून चुकीचे रिडींग घेणे व फोटो अस्पष्ट असणे, रीडिंग न घेता आल्याचा किंवा मीटर नादुरूस्त असल्याचा शेरा देणे असे हेतुपुरस्सर केलेले प्रकार लपून राहत नाहीत. ग्राहकांचे घर किंवा आस्थापना बंद असणे, वीजमीटरची जागा रीडिंग घेण्यास योग्य नसणे आदी अपवाद वगळता अचूक रीडिंग व स्पष्ट फोटो घेतलेच पाहिजे अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा पवार यांनी मीटर रीडिंग एजन्सींच्या प्रतिनिधींना दिला.