आमदार जगताप यांनी सोनोरी गावी जात केला सत्कार
वाघापूर – सोनोरी(ता. पुरंदर) येथील स्नेहल अमित काळे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेमार्फत सहकार अधिकारी वर्ग-2 पदी निवड झाल्याने पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी काळे यांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान केला.
याप्रसंगी काँग्रेसचे नेते संभाजी काळाणे, संतोष सोनवणे, शरद काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय कोलते, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप, सोनोरी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विकास सोसायटी अध्यक्ष, उपाध्यक्ष, विविध संस्था, संघटना पदाधिकारी यांनी स्नेहल काळे यांचे अभिनंदन केले.
स्नेहल काळे या पिसर्वे गावातील गोरख शिवाजी कोलते व मीनाक्षी कोलते यांच्या कन्या आहेत. त्यांचे 1ली ते 4 थी पर्यंतचे शिक्षण पिसर्वे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, इयत्ता 5 वी ते 10 वीपर्यंतचे शिक्षण डॉ. शंकरराव कोलते माध्यमिक विद्यालय पिसर्वे येथे,
11 वी ते 12 वी पर्यंतचे शिक्षण मराठवाडा मित्र मंडळ पुणे येथे तर पदवी कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण सासवड येथील वाघिरे विद्यालयात झाले. स्नेहल काळे या 2018 पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देत होत्या. त्यांना 11 डिसेंबर 2023 च्या परीक्षेत यश मिळाले. त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होऊन अभिनंदन होत आहे.