सोमवारी बँक खात्यात वर्ग होणार : यंदा 115 टक्के जादा गाळप
सुपे – श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या 2023-2024 विक्रमी गळीत हंगामाची नुकतीच सांगता झाली आहे. दरम्यान, कारखाना 100 रुपये प्रति टन प्रमाणे दुसरा हप्ता ऊस उत्पादकांच्या खात्यात सोमवारी (दि. 6) वर्ग करण्यात येणार असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी जाहीर केले.
कारखान्याने 176 दिवसांमध्ये एकूण 15 लाख 23 हजार 876 टन उसाचे सर्वोच्च गाळप करून बी हेवीसह 12.21 टक्के सरासरी साखर उतारा राखून 18 लाख 26 हजार 500 क्विटल साखरेचे उत्पादन झालेले आहे. त्याचबरोबर कारखान्याच्या डिस्टीलरीमधून 84 लाख 31 हजार 438 लि. अल्कोहोल, 31 लाख 82 हजार 554 लि. इथेनॉलचे उत्पादन व को-जन प्रकल्पातून 9,65, 15,345 युनिटस् विजेची निर्मिती होवून 5.14.44.831 युनिटची विक्री झालेली असून सध्या हे दोन्हीही प्रकल्प सुरु आहेत.
या गळीत हंगामामध्ये राज्यातील 7,500 टन प्रतिदिनी गाळप क्षमता असणार्या कारखान्यांमध्ये सोमेश्वर कारखान्याचे सर्वोच्च गाळप व साखर उत्पादन झाले आहे. हंगाम कालावधीमध्ये प्रतिदिन सरासरी 8.658 टन गाळप करुन स्थापित क्षमतेनुसार 115 टक्के कार्यक्षमतेने 2,03,876 टन जादाचे गाळप केलेले आहे.
कारखान्याने ऊस बिलापोटी प्रथम हप्ता 3 हजार रुपये प्रति टन प्रमाणे दि.15 एप्रिल पर्यंत गळीतास आलेल्या उसास आदा केलेला असून अंतिम पंधरवड्याचे बील 3 हजार अधिक 200 रुपये प्रमाणे अनुदान शनिवारी (दि. 4) बँक खात्यात जमा केले आहे. तसेच कारखान्याने कार्यक्षेत्रातील सभासद व बिगर सभासद यांच्या उसाला जानेवारी, फेब्रुवारी, मार्च व एप्रिल, 2024 साठी अनुक्रमे 75, 100, 150 व 200 रुपये असे अनुदानही यापूर्वीच आदा केलेले आहे, असे अध्यक्ष जगताप यांनी सांगितले.