पुणे – शहरात सकाळी मोठ्या प्रमाणात धुके पसरले होते. तर ढगाळ वातावरणामुळे पाऊस पडण्याची शक्यता वाटत होती. मात्र, पावसाने हुलकावणी दिली आणि दिवसभर आकाश निरभ्र असल्यामुळे उन्हाचा चटका वाढला होता. दरम्यान संध्याकाळी पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यासह काही भागात पावसाच्या जोरदार सरी पडल्या.
मागील चार दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील बदलत्या हवामानामुळे कमाल व किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली होती. किमान तापमान 20 तर कमाल तापमान 32 अंशाच्या पुढे गेले होते. बुधवारी दि. 29 सकाळी धुके पडल्यानंतर 10 वाजेपर्यंत ढगाळ वातावरण होते. त्यामुळे पाऊस येण्याची शक्यता असताना, अचानक हवामानात बदल झाला आणि सुर्यनारायणाने दर्शन दिले.
दिवसभर शहरात उन्हाचा चटका जाणवत होता. दरम्यान आज किमान तापमानात दोन अंशाने घट झाली असून, 17.3 अंशसेल्सिअस तापमानाची नोंद झाली . तर पुढील दोन दिवसात शहरात हवामान कोरडे राहील, पावसाच्या हलक्या एक ते दोन सरी पडतील.
राज्यात पुढील तीन दिवस पावसाचे
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. विशेषत: नाशिक, अहमदनगर, पुणे, जळगाव, औरंगाबाद, वाशिम, यवतमाळ, बीड, अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. तर काही भागात गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.