पीएम ई विद्या : टीव्हीच्या माध्यमातून अभ्यासाचे धडे
पुणे – नव्या शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर देशभरात 200 शैक्षणिक चॅनेल सुरू केली जाणार आहेत. पीएम ई विद्या या उपक्रमाद्वारे ही सुविधा उपलब्ध होणार आहे. यातून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत.
नवीन शैक्षणिक धोरणाच्या घोषणेला दि. 29 जुलै रोजी तीन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त ही 200 चॅनेल्स लॉंच केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यात महाराष्ट्रासाठी पाच शैक्षणिक चॅनेल्स आहेत. त्यातील एका चॅनेलचे टेस्टिंग पूर्ण झाले आहे. तर, उर्वरित काम वेगाने पूर्ण केले जात आहे. त्यासाठी दि. 20 जुलैची डेडलाइन आहे. यानंतर एमएच-113, एमएच-114, एमएच-115, एमएच-116 आणि एमएच-117 या चॅनेलवरून विविध विषयांचे अभ्यासज्ञान टीव्हीद्वारे विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे.
आधी बालचित्रवाणी, आता ई-विद्या
महाराष्ट्रात बालचित्रवाणीच्या माध्यमातून विविध शैक्षणिक कार्यक्रम शालेय विद्यार्थ्यांना पाहण्यास उपलब्ध होत होते. मात्र, 2017 मध्ये राज्य सरकारने बालचित्रवाणी उपक्रमच बंद केला. तर, आता पीएम-ई-विद्या उपक्रमातून हे शैक्षणिक चॅनेल सुरू होणार आहेत. यातून विद्यार्थ्यांना टीव्हीच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत.
अहमदाबाद येथून कामकाज
महाराष्ट्रासाठी सुरू केल्या जाणाऱ्या शैक्षणिक चॅनेल्सपैकी एमएच-113 साठी डेटा तयार करून तो यंत्रणेत अपलोड करून त्याची युद्धपातळीवर चाचणी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे उद्घाटन केले जाण्याचे सूत्रांनी सांगितले. देशातील प्रत्येक राज्यात स्थानिक भाषेतील शैक्षणिक चॅनल सुरू केले जात आहेत. अहमदाबाद (गुजरात) येथून या सर्व चॅनेलचे काम पाहिले जाणार आहे.