पुणे : मार्केट यार्डात जांभळाची हंगामातील पहिली आवक झाली आहे. घाऊक बाजारात प्रतिकिलोस तब्बल ६०० रुपये भाव मिळाला. नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील संपत कोथिंबिरे यांच्या शेतातून ५ किलो जांभळाची आवक झाली. येत्या काही दिवसांत जांभळाची आवक नियमित
होणार असून, त्यामध्ये वाढ होईल, असे व्यापारी पांडुरंग सुपेकर यांनी सांगितले़. दरम्यान पहिल्या जांभळांची पूजा करण्यातन आली़. त्यावेळी उद्योजक गौरव घुले, शरद कुंजीर, सागर भोसले, महेश बेंद्रे, पांडुरंग सुपेकर आदी उपस्थित होते़. वडगावशेरी येथील मुकुंदा फ्रुटचे मुकुंद सगरे व सोमनाथ धाडगे यांनी जांभळाची खरेदी केली.
आवकविषयी सुपेकर म्हणाले, दरवर्षी १० मार्चच्या सुमारास जांभळाची बाजारात आवक सुरू होत असते. मात्र, यावर्षी लवकर झाली आहे. जुन-जुलैपर्यंत या जांभळाची आवक सुरू राहणार आहे. यंदा जांभळाचे उत्पादन चांगले राहण्याचा अंदाज आहे. लवकरच आवक नियमित सुरू होऊन भावात घसरण होईल, असेही सुपेकर यांनी सांगितले.