पुणे – करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर न्यायालयापाठोपाठ उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार कौटुंबिक न्यायालयातील न्यायालयाच्या कामकाजावरही निर्बंध आले आहेत. कौटुंबिक न्यायालयाचे कामकाज दोन सत्रात सुरू झाले आहे.
कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश सुभाष काफरे यांनी या संदर्भातील कार्यालयीन आदेश काढले आहेत. त्यानुसार, सकाळी अकरा ते दुपारी एक आणि दुपारी दोन ते चार अशा प्रत्येकी दोन तासांच्या सत्रांत न्यायालयीन कामकाज सुरू राहणार आहे. त्यामध्ये तातडीच्या दाव्यांवर सुनावणी होणार आहे, तर पुरावा नोंदविणे, युक्तिवाद ऐकणे आदी कामे ऑनलाइन सुरू राहणार आहेत.
न्यायालयाचे कार्यालयीन कामकाज कर्मचाऱ्यांच्या पन्नास टक्के क्षमतेने सकाळी साडेदहा ते दुपारी साडेचारपर्यंत सुरू राहणार आहे. न्यायालयातील कॅंटीनमध्ये केवळ पार्सल सुविधा सुरू राहणार आहे. न्यायालयाच्या आवारात मास्क, सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतर, या करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.