पुणे -संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठी पीएमपीने मंगळवारपासून जादा बसेसचे नियोजन केले आहे. दि. 12 जूनपर्यंत या जादा बस धावणार आहेत. दोन्ही संतांच्या पालखी मुक्कामी असल्याने शहराच्या विविध भागांतून पालखीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठीही पहिल्यांदाच विशेष बस धावणार आहेत.
अशी असेल आळंदीसाठी बससेवा
पालखी सोहळ्याला आळंदी येथे जाण्यासाठी स्वारगेट, महापालिका भवन, हडपसर, पुणे रेल्वे स्थानक, निगडी, भोसरी, हिंजवडी, चिंचवड या ठिकाणांवरून नेहमीच्या बसेस व्यक्तिरिक्त दररोज 142 जादा बसेस सोडल्या जाणार आहेत. या बसेस 11 जूनच्या मध्यरात्री बारा वाजेपर्यंत असणार आहेत. तर पालखी प्रस्थानाला पहाटे अडीच वाजेपासून स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर, महापालिका भवन येथून आळंदीला जाण्यासाठी स्वतंत्र 18 जादा बस असणार आहेत. या व्यतिरिक्त पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथूनही आळंदीसाठी दैनंदिन सुरू असलेल्या 118 बसही आळंदीला जाण्यासाठी पहाटे साडेपाच वाजेपासून उपलब्ध असतील.
देहू मार्गावरही जादा बस
भाविकांना श्रीक्षेत्र देहूला जाणासाठी पुणे स्टेशन, महापालिका भवन, निगडी येथून विशेष बस सोडण्यात येणार आहेत. त्यासाठी सुमारे 30 जादा बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तर आळंदी ते देहू मार्गासाठी 18 स्वतंत्र बसेस असणार आहेत.
हडपसरच्या बस कॅम्प येथून सुटणार
या दोन्ही पालख्या दि.14 जून रोजी हडपसर येथे दुपारी 12 ते 1 वाजेदरम्यान विसाव्याला असतील. सकाळपासून हडपसर येथील बस संचलनावर परिणाम होणार आहे. त्यामुळे दर्शन घेऊन परत जाणाऱ्या भाविकांसाठी महात्मा गांधी बसस्थानकातून पुणे स्टेशन, वारजे- माळवाडी, कोथरूड डेपो, निगडी, चिंचवड, आळंदी या ठिकाणी जाण्यासाठी बसेसची सुविधा असेल. तर कात्रज- कोंढव्याकडे जाण्यासाठी शिवरकर गार्डन येथून तर मुंढवा-चंदननगर- वाघोलीसाठी मगरपट्टा सिटी येथून बस सुटतील.