पुणे –सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे येत्या 15 फेब्रुवारीपासून प्रथम सत्राच्या परीक्षा सुरू होत असून आतापर्यंत सुमारे 20 टक्के विषयांचे वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे. उर्वरित विषयांचे वेळापत्रक पुढील आठवड्यात प्रसिद्ध होणार असल्याचे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी सांगितले.
विद्यापीठातर्फे फेब्रुवारी- मार्च महिन्यात ऑनलाइन पद्धतीने प्रथम सत्राच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्यातील विधी, अभियांत्रिकी,व्यवस्थापनशास्त्र व फार्मसी या अभ्यासक्रमांच्या काही विषयांच्या परीक्षांचे वेळापत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी पंधरा दिवस ते एक महिना आधी परीक्षेचे वेळापत्रक मिळावे, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे.