मुंबई : ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी सुपरमार्केटमध्ये वाइन विक्री करण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन केले मात्र यावेळी त्यांनी राजकीय नेत्यांचा उल्लेख करत केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे यांचा उल्लेख करताना बंडातात्या कराडकर यांनी सर्वच राजकीय नेत्यांची मुले दारु पित असल्याचाही दावा केला. दरम्यान, यावेळी त्यांनी सुप्रिया सुळेंबाबत काही आक्षेपार्ह उल्लेख केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे.तसेच गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहेत. दरम्यान, राजकीय वातावरण तापल्याने बंडातात्या कराडकर यांनी माफी मागितली आहे.
साताऱ्यात बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या विरोधात दंडवत दंडुका आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना बंडातात्या कराडकर यांनी राज्यातील नेते आणि त्यांची मुले रस्त्यावर दारू पिऊन पडत असतात आणि याचे पुरावेदेखील असल्याचे म्हटले होते.
“ज्यांनी माझ्यावर आक्षेप घेतला आहे त्यांच्याशी मी प्रत्यक्ष फोनवर बोललो आहे. माझं चुकलं असेल तर मी क्षमा मागण्यास तयार आहोत. आपल्या तोंडून काही चुकीचं असेल तर क्षमा मागण्यात कमीपणा नाही,” असे बंडातात्या प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.
गुन्हा दाखल झाला नाही तर खटला दाखल करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आला आहे. तसंच राज्यभरात आंदोलनाचाही इशारा देण्यात आला आहे. दरम्यान प्रक्षोभक भाषण आणि बेकायदेशीर आंदोलन केल्याप्रकरणी बंडातात्या कराडकर यांच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.